संपादकीय
विहिरीत पडलेल्या ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचे प्राण वाचविले…..!
केज दि.२१ – गावी जाणारा रस्ता चुकल्याने भरकटलेल्या एक सत्तर वर्षाची वृद्ध महिला केज तालुक्यातील माळेगाव येथील एका विहिरीत पडली. परंतु तिने धीर न सोडता विहिरीतील एका रस्सीला पकडून मदतीसाठी आरडा-ओरड केली. परंतु रात्रीची वेळ आणि त्यात गावापासून विहीर लांब असल्यामुळे तिचा आवाज कुणालाच ऐकू जात नव्हता. तिचे नशिब बलवत्तर म्हणून काही वेळाने त्या विहिरी जवळून जात असलेल्या एकाने आवाज ऐकून विहिरीत पाहिले आणि इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्या वृद्ध महिलेस विहिरी बाहेर काढून तिला जीवदान दिले.
अधिक माहिती अशी की, दि. ३० जुलै बुधवार रोजी कांताबाई शिवराम लोणकर वय (७० वर्ष) रा. जवळगाव ता. अंबाजोगाई या बोरवटी येथील त्यांची मुलीगी मनीषा ज्ञानदेव कुंभार हिच्याकडे गेल्या होत्या. परंतु वयोमाना नुसार त्यांची स्मृती कमी झाल्यामुळे त्या त्यांच्या मूळगावी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील जवळगाव येथे जाण्यासाठी निघाल्या; परंतु त्यांना काही न सुचल्यामुळे त्या भरकटून माळेगाव ता. केज येथील शिवारात फिरू लागल्या. रात्री ८:३० ते ९:०० वा. अंधारात माळेगाव येथील विहिरीत अर्जुन दोडके यांच्या विहिरीत पडल्या. विहिरीत पडल्या परंतु कांताबाई यांनी जिद्द सोडली नाही. तशा अंधारातही चाचपडत त्यांनी विहिरीतील पाण्याच्या मोटारला बांधलेल्या रस्सीला पकडले आणि मदतीसाठी वाचवा वाचवा अशी जिवाच्या आकांतनर आरडाओरड सुरू केली. परंतु त्या अंधारात त्यांचा आवाज कोणालाही ऐकू जात नव्हता. मात्र सुदैवाने त्या वेळी त्या विहिरीजवळून जाणारे बाळू दोडके यांना आवाज ऐकू आला. त्यांनी मोबाईलच्या प्रकाशाने पाहिले असता कांताबाई लोणकर दिसल्या. मात्र एकट्याला विहिरी बाहेर काढणे शक्य नव्हते; म्हणून बाळू दोडके यांनी कांताबाई हिला बोलून धीर दिला आणि गावात जाऊन मदतीला गावकऱ्यांना घेऊन येतो असे सांगून मदतीसाठी गावात गेले गावात जाऊन अर्जुन गव्हाणे, कल्याण गव्हाणे आणि लक्ष्मण गव्हाणे यांना सोबत घेऊन विहीरीवर गेले. गावकऱ्यांनी विहिरीत उतरून नंतर त्यांनी रस्सीचा आधार घेऊन कांताबाई यांना विहिरीच्या पाण्याबाहेर काढले. त्याना गावात आणून कोरडे कपडे साडी देऊन प्रथमोपचार केले आणि ऊब दिली. मात्र या आघातामुळे कांताबाई या प्रचंड घाबरलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना काही आठवेना झाले व ओळख सांगता येईना. सामाजिक कार्यकर्ते कल्याण लोकरे यांनी पत्रकार गौतम बचुटे याना ही माहिती दिली. नंतर त्यानी ही माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप आटोळे यांना दिली. तसेच सोशल मिडीयांच्या मद्यमातून केज, युसुफवडगाव, बर्दापूर, नेकनूर, धारूर, बीड या पोलीस ठाणे हद्दीत माहिती देऊन कांताबाई लोणकर यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना माहिती देण्याची विनंती केली. नंतर थोडी भीती कमी होऊन त्या सावरल्या नंतर कांताबाई यांनी त्यांच्या नातेवाईकांची माहिती दिली. जवळगाव व बोरवटी येथे संपर्क साधून त्यांना माहिती दिली. दि. २१ जुलै गुरुवार रोजी कांताबाई लोणकर यांचा मुलगा दिगंबर लोणकर, मुलगी मनीषा कुंभार, जावई ज्ञानदेव कुंभार आणि नामदेव कुंभार, दत्तू कुंभार व विजय पाटणकर हे माळेगाव येथे आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे पोलीस नाईक बाळासाहेब घोरपडे यांनी कांताबाई लोणकर यांचा जीव वेळ वाचविणाऱ्या बाळू दोडके, अर्जुन गव्हाणे, कल्याण गव्हाणे आणि लक्ष्मण गव्हाणे यांचे कौतुक केले. त्या नंतर कांताबाई लोणकर यांना त्यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या गावाकडे रवाना केले.
जर त्या विहिरीत रस्सी नसती आणि कोणी आवाज ऐकला नसता तर पाण्याने भरलेल्या विहिरीत कांताबाई लोणकर यांच्या जीविताला धोका उत्पन्न झाला असता. परंतु कांताबाई लोणकर यांना वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून बाळू दोडके, अर्जुन गव्हाणे, कल्याण गव्हाणे आणि लक्ष्मण गव्हाणे यांचा सत्कार व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.