क्राइम
केजच्या गस्तीपथकाने चौघांना पकडले रंगेहाथ…..!
केज दि.२४ – रात्रीच्या वेळी गस्त घालित असलेल्या पोलीस पथकाने विहिरीतील मोटारींची चोरी करणाऱ्यांचा पाठलाग करून चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या पैकी तिघे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे आढळून आले.
अधिक माहिती अशी की, दि. २३ जुलै ते २४ जुलै दरम्यान रात्रीच्या वेळी केज पोलीसांचे गस्ती पथकातील पोलीस जमादार अशोक थोरात आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे, बजरंग इंगोले हे केज पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत होते. रविवारच्या मध्यरात्री १.३० च्या दरम्यान पोलीस पथकाला शिंदी ता. केज येथे एक संशयित वाहन दृष्टीस पडले. त्याला थांबण्याचा इशारा करूनही ते थांबले नाही म्हणून पोलिस पथकाने त्यांचा सरकारी वाहनाने पाठलाग करून त्यांना अडविले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाहनात खते व बी-बियाणे असल्याचे सांगितले. मात्र पोलीस पथकाने पाहणी केली असता त्यांचेकडे वाहनात तीन पाणबुडी पंप आणि वायर कटर, पाइप कापण्याची ब्लेड, स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर, पक्कड असे साहित्य आढळून आले. त्यामुळे पोलिस पथकाने त्यांना त्यांच्या वाहन आणि साहित्यासह केज पोलीस ठाण्यात आणले. केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी अधिक चौकशी केली असता ते चौघे हे धारूर तालुक्यातील मैंदवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पाण्याच्या मोटारी या धारूर तालुक्यातील मैंदवाडी परिसरातून चोरून आणल्या होत्या हे स्पष्ट झाले. सिद्धेश्वर मोहन मैंद, वय (१९ वर्ष), ऋषिकेश रावसाहेब मैंद, वय(२१ वर्ष), महेश सखाराम केदार, वय (१९ वर्ष) आणि बालाजी रामेश्वर मैंद वय (१९ वर्ष), सर्व रा. मैंदवाडी ता. धारूर येथील आहेत.
सदरची घटना ही धारूर तालुक्यातील असल्याने केज पोलिसानी त्या चौघांना धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या ताब्यात दिले.
शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरच्या मोटारी, स्टार्टर, पाईक, स्प्रिकंलर असे साहित्य चोरणाऱ्यांची टोळी पकडणाऱ्या गस्ती पथकातील पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चौघाकडून अनेक चोरीच्या घटना उघडकीस येऊ शकतात.