क्राइम
केज तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या…..!
केज दि.२३ – एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धोतरा ( ता. केज ) शिवारात २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संतोष बाबुराव बांगर ( रा. हंगेवाडी ता. केज ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हंगेवाडी ( ता. केज ) येथील संतोष बाबुराव बांगर ( वय ३० ) यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आई ही त्यांना घेऊन माहेरी हंगेवाडी येथे राहिल्या. मजुरी करून त्यांनी धोतरा शिवारात दोन एकर जमीन घेतली. मात्र जमिनीतून निघणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची गुजराण होत नसल्याने संतोष बांगर याने कर्जावर ट्रॅक्टर खरेदी केले. तो साखर कारखान्याला ट्रॅक्टर घेऊन ऊस वाहतूक करीत होता. मात्र ट्रॅक्टरचे कर्जाचे हप्ते वेळेवर चुकते करता न आल्याने कर्ज वाढले. शेवटी कर्जबाजारीपणाला कंटाळून संतोष बांगर याने टोकाची भूमिका घेत मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या नंतर धोतरा शिवारातील शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस चौकीचे जमादार अशोक मेसे, पोलीस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.