महाराष्ट्र
महाराष्ट्रात मेगा भरती, शिंदे – फडणवीस सरकारची घोषणा…..!
मागील दोन ते तीन वर्षात कोरोना महामारीमुळे कोणत्याही प्रकारची भरती करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनामध्ये संभ्रम आणि निराक्षा निर्माण झाली. तसेच शासकीय सेवेत अनेक पदे रिक्त असताना राज्य सरकार भरती करीत नसल्याने अनेक वेळा आंदोलने देखील करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आगामी काळात तब्बल 78 हजार 257 पदांची भरती करण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने तब्बल ७८ हजार २५७ पदांची भरती करण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यासंदर्भात सोमवारी सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. गृह विभागातील सात हजार २३१ पदांचाही त्यात समावेश असून ही भरती प्रक्रिया साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती मिळते आहे. राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत.तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागांनी १५ दिवसांत आयोगाकडे मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यातून जवळपास ११ हजार २६ पदांची भरती होईल. तसेच पावसाळी अधिवेशनात सुरूवातीला 7 हजार पोलीस विभागामध्ये भरती करणार असून दुसऱ्या टप्प्यात 7 हजार अशी 14 हजारांची भरती पोलिस विभागात देखील करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे.