क्राइम
केज शहरातील बिअर बारवर पंकज कुमावत यांच्या पथकाची धाड…..!
केज दि.१ – गणेश चतुर्थी निमित्त सर्व देशी दारू दुकाने आणि बिअर बार परमिट रूम यांच्या अनुज्ञपत्या बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या केज येथील एका बिअर बार मध्ये मागील दाराने विक्री करीत असलेल्या बिअर बारवर पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बुधवार दि.३१ ऑगस्ट रोजी माहिती समजली की, केज येथील केज-बीड महामार्गावरील शिक्षक कॉलनी जवळ असलेले प्रशांत बिअरबार हे गणेश चतुर्थी निमित्त दारू व मद्य विक्री बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून आणि समोरील दरवाजा बंद करून मागच्या दाराने दारू विक्री करीत आहे. माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, सचिन अहंकारे, संजय टूले आणि रामहरी भंडारे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच या पथकाने सायंकाळी ७:३० वा. प्रशांत बिअरबारवर छापा टाकला असता पाठीमागील दरवाजा उघडा ठेवुन त्यातून ग्राहकांना दारू देत असल्याचे आढळून आले. बिअर बारमध्ये दोन इसम हे आतील चौघांना दारू विक्री करीत असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले.
दरम्यान, पोलिस पथकाने दारू विक्री करणारांची चौकशी केली असता त्यांची नावे ही अशोक साहेबराव खाडे रा. सुकळी ता. केज आणि सागर रंगनाथ सावंत रा. सावंतवाडी ता. केज हे असल्याचे निष्पन्न झाले. पंचा समक्ष बिअरबार मधील १ लाख ४१ हजार रु चा मुद्देमाल जप्त केला.पोलीस अंमलदार बाबासाहेब बांगर यांच्या फिर्यादी वरून प्रशांत बिअरबारचे मालक कैलास विलास रांजणकर आणि त्यांचे नौकर अशोक साहेबराव खाडे, सागर रंगनाथ सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच पथकाने शहरातील दोन ठिकाणी छापे मारून ६ हजार ९०० रु. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.