क्राइम
पोलीस अधिकारी असल्याचे सांगत तोतयाने शेतकऱ्यास लुटले……!
केज दि.५ – शेतात कुत्र्याला भाकरी घेऊन निघालेल्या वृद्ध शेतकऱ्याच्या वाटेत भेटलेल्या एका तोतया पोलीस निरीक्षकाने तीन अंगठ्या व सोन्याची चैन असा २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज हातचलाखी करीत लांबविल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील वकीलवाडी भागातील शेतकरी महादेव शाहू चौरे ( वय ६५ ) हे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता स्कुटीवरून ( एम. एच. ४४ आर. ७४८८ ) कळंब रस्त्यावरील शेतात कुत्र्यास भाकरी घेऊन निघाले होते. या रस्त्यावरील चित्रपट गृहासमोर गेले असता दुचाकीवरून आलेल्या व डोक्याला हेल्मेट असलेल्या व्यक्तीने त्यांना थांबवून त्याने मी पोलीस इंस्पेक्टर असल्याचे सांगून त्याने ओळखपत्र ही दाखविले. त्याने तुम्हाला तुकाराम शिंदेला लुटल्याचे माहिती नाही का, तुम्ही एवढं सोने घालून का फिरतात असे म्हणत त्यांना गळ्यातील सहा तोळ्याची सोन्याची चैन व हातातील तीन अंगठ्या काढायला लावून रुमालात ठेवल्या. तो रुमाल त्यांच्या स्कुटीच्या डिकीत ठेवून घरी ठेवून या असे सांगितले. त्यामुळे महादेव चौरे हे घराकडे निघाले. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना शंका आल्याने त्यांनी स्कुटी थांबवून डिकी उघडून रुमालात अंगठ्या व चैन आहेत का ? याची खातरजमा केली असता त्यांना अंगठ्या व सोन्याची चैन दिसून आली नाही. त्या तोतया पोलीस निरीक्षकाने हातचलाखी करीत तीन अंगठ्या व ६ तोळ्याची सोन्याची चैन असा २ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. दरम्यान, महादेव चौरे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे पुढील तपास करत आहेत.