देशविदेश
कारमध्ये मागे बसणाऱ्यासाठीही नियम लागू…..!
केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल.
केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) च्या नियम 138(3) अंतर्गत, मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नाही. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिसही दंड आकारत नाहीत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. मी या संबंधित फाइलवर सही केली. असंही गडकरी म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन नियम (1989) च्या कलम 138(3) नुसार कारमध्ये सीटबेल्ट प्रदान केला जातो. त्या कारमध्ये ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट बांधणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच 5 सीटर कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. ज्या 7 सीटर कारमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचे चेहरे पुढच्या बाजूस असतात, तिथेही सीट बेल्ट लावणे आवश्यक करण्यात आले आहे.