#Accident
एकाच कुटुंबातील दोघांवर काळाचा घाला…..!
बीड दि.९ – दारु सोडविण्यासाठी गेलेले धारूर तालुक्यातील बचाटे कुटुंब परत गावाकडे येताना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ब्रह्मपूरी जवळ वाहनाचा अपघात होऊन दोघे जागीच ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. यातील तिघे गंभीर जखमी असून दोघांवर परभणी तर एकावर लातूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
धारुर तालुक्यातील उमरेवाडी येथील बचाटे कुटुंब एकाची दारु सोडविण्यासाठी खाजगी वाहन करुन परभणी जिल्ह्यातील लोहगाव येथे गेले होते. इंजेक्शन घेऊन परत उमरेवाडी येथे येताना ब्रह्मपूर ( जि. परभणी ) जवळ रस्त्यावर असलेल्या बंधाऱ्या नजीक वाहन भरधाव अन् रस्ता अरुंद पाहून चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वाहन पलट्या खात रस्त्याच्या खाली जाऊन भीषण अपघात घडला. यामध्ये अशोक ( बाबुराव ) अर्जून बचाटे रा. उमरेवाडी ( ता. धारुर ), जयश्री सचिन बचाटे रा. उमरेवाडी ( ता. धारुर ) या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. सचिन भास्कर बचाटे, भास्कर रामभाऊ बचाटे, दिनकर बालासाहेब बचाटे सर्व रा. उमरेवाडी ( ता. धारुर ), दादासाहेब भोसले रा. शिंगणवाडी ( ता. धारुर ) व चालक ( नाव समजले नाही ) हे पाच जण जखमी झाले. यातील सचिन बचाटे, भास्कर बचाटे आणि दादासाहेब भोसले हे तिघे गंभीर जखमी आहेत. सचिन व भास्कर या दोघांवर परभणी येथे उपचार सुरू आहेत. दादासाहेब भोसले यांना लातूर येथे हलविण्यात आले आहे. चालक व इतर एकजण किरकोळ जखमी आहे.
अपघाताची बातमी कळताच उमरेवाडी व परिसरावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. आज शुक्रवारी ( दि. ९ ) सकाळी ११ च्या सुमारास दोघाही मयतांवर उमरेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपा नेते रमेश आडसकर यांच्या सह रुई धारुर, आसरडोह सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती गेल्याने व दोघं गंभीर असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.