एका गावच्या ग्रामस्थांनी थेट आपले गावच विक्रीला काढले आहे. बरं ते काय एखादी वस्ती किंवा लहान गाव असंही नाही. तब्बल 3 हजार लोकवस्ती असलेलं ते गाव आहे. गाव विक्रीला काढले आहे हे इतरांच्या लक्षात यावे म्हणून येथील ग्रामस्थांनी तसे फलकच लावले आहेत.परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील माहेर येथील ग्रामस्थांना आजही मूलभुत सोई-सुविधाच मिळालेल्या नाहीत तर पीक विम्यातूनही या गावाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा कोणताच आधार गावाला नसल्याने गावकऱ्यांनी थेट गावच विक्रीला काढले आहे.
माहेर हे परभणी जिल्ह्यातील एक गाव असून त्याची लोकसंख्या ही 3 हजार आहे. गावची लोकसंख्या अधिक आहे शिवाय क्षेत्रफळही जास्त आहे. असे असतानाही लोकप्रतिनीधींचे विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांच्या प्रसंगी वेगवेगळी आश्वासने दिली जातात, पण पूर्तता काहीच होत नाही. गावाला रस्ता नाही की विजेची सोय नाही. मुलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांची हेळसांड सुरु आहे.
देशात नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडला. पण याच देशातील गावची अशी दयनिय स्थिती असून गावाला साधा रस्ताही नाही. शिवाय पीक विम्यापासून गावाला वंचित ठेवण्यात आले आहे.
गाव विक्रीला हे केवळ सांगण्यापुरतेच नाही तर ग्रामस्थांनी तसा फलकही लावला आहे. जर सरकारने विक्रीसाठी परवानगी दिली नाही तर खाजगी राज्याचा दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.