#Accident
विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू…..!
केज दि.८ – पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण करुन त्यात सोडलेल्या वीज प्रवाहचा करंट लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाडेवडगाव ( ता. केज ) शिवारात शनिवारी ( दि. ८ ) दुपारी घडली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक विठ्ठल लाड ( वय ३६ वर्ष ) रा. लाडेवडगाव ( ता. केज ) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी ते शेतात गेले होते. शेतातील पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. याची अशोक लाड यांना कल्पना नव्हती. ते काम करताना तारेला स्पर्श झाला. विद्युत प्रवाह सुरू असल्याने करंट लागून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिट अंमलदार विलास तुपारे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पाठविला आहे. उशीर झाल्याने शवविच्छेदन न झाल्याने मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला असून, उद्या शवविच्छेदन होईल अशी माहिती दिली. या घटनेने लाडेवडगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रान डुक्कर, हरीण सह आदि वन्य प्राणी पिकांची नासधूस करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी तारेचे कुंपण करत आहेत. तर काही ठिकाणी यात विद्युत प्रवाह सोडण्यात येत आहे. यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.