#Accident
वीज पडून दोन म्हशी, बैल ठार….!
केज दि.१५ – तालुक्यातील पळसखेडा शिवारात झाडावर वीज पडून एका सालगड्याच्या दोन म्हशी ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. तर दुसरी घटना पिराचीवाडी येथे गोठ्यावर वीज पडून बैल ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास घडली.
बोरीसावरगाव ( ता. केज ) येथील शाहू मारुती पौळ हे पळसखेडा शिवारातील मीरा महादेव पवार यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला आहेत. सालगडी शाहू पौळ यांच्या मालकीच्या मुऱ्हा जातीच्या दोन गाभण म्हशी शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शेतातील चिंचेच्या झाडाखाली बांधल्या होत्या. याचवेळी सुरू असलेल्या पावसात अचानक झाडावर वीज कोसल्याने शाहू पौळ यांच्या दोन्ही म्हशी जागीच मरण पावल्या. त्यात त्यांचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेची माहिती मिळताच लाडेगाव सज्जाचे तलाठी विष्णू पटाईत, बोरीसावरगाव सज्जाचे तलाठी फैजल शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सालगड्याने कष्ट करून घेतलेल्या दोन म्हशी गेल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
दुसरी घटनेत केज तालुक्यातील पिराचीवाडी येथील शेतकरी सतीश शामराव कराड यांच्या शेतातील गोठ्यावर शुक्रवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास पावसात वीज पडल्याने गोठ्यात बांधलेला बैल जागीच मरण पावला. शेतकरी सतीश कराड यांचे ७० ते ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी श्री. डोरले व तलाठी बी. एस. तोगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.