हवामान
पाऊस कधी थांबणार ? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती…..!
मुंबई दि.२२ – राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने प्रचंड कहर माजवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान माजवलेलं बघायला मिळतंय. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला, जनजीवन विस्कळीत झालं. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पाण्याने बळीराजाच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं. पीकं वाहून गेली. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सर्व आशांवर पाणी फेरलं गेलं. हे संकट आणखी किती दिवस राहील? अशी चिंता बळीराजाला सतावत होती. पण सुदैवाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आज समोर आली आहे. हवामान विभागाने आज एक महत्त्वाची माहिती दिली.
राज्यातील पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला आहे. पुढच्या 48 तासांमध्ये पाऊस फक्त राज्यच नाही तर देशभरातील वातावरणं कोरडं होणार आहे.
हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी वातावरणातील बदलाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. विदर्भातील अनेक भागांमधून पाऊस आता निरोप घेणार आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं आहे. याशिवाय छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणातील काही भागातून पाऊस जाणार असल्याची देखील माहिती होसाळीकर यांनी दिलीय. विशेष म्हणजे होसाळीकर यांनी राज्य आणि देशभरातून पाऊस कधी जाणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या 48 तासांमध्ये देशभरातील वातावरण कोरडं होणार आहे. त्यामुळे पाऊस आता जाणार आणि हिवाळ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.