#Election
मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी प्रा. किरण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा……!

मुंबई दि.२२ – मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून प्राध्यापक किरण पाटील हे भाजप आणि शिक्षक परिषदेचे संयुक्त उमेदवार असतील, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. किरण पाटील यांनी गेल्या 14 ऑक्टोबर रोजीच हजारो शिक्षकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाच मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून किरण पाटील यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते.

राज्यात नागपूर शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, नाशिक आणि अकोला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने किरण पाटील यांना मराठवाड्यात शिक्षक नोंदणी अभियानाचे प्रमुख केले आहे. याबाबत बावनकुळे यांनी सांगितले की, किरण पाटील यांच्या रुपात प्रचंड ताकदीचा कार्यकर्ता भाजपला मिळाला आहे. त्यांना आम्ही संपूर्ण रणांगण दिले आहे. यात ते नक्की यशस्वी होतील. काँग्रेस व राष्ट्रवादीचा हा गड जिंकण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मराठवाड्यात भाजपचे सर्व युनिट्स कार्यरत करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील शिक्षक संघटनांमध्ये किरण पाटील यांच्या माध्यमातून भाजपची जोरदार एन्ट्री झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडे नसलेला या मतदारसंघात यंदा 100 टक्के भाजप विजय मिळवेल.