#Election
गाव कारभारी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल……!
केज दि.३ – राज्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत.केज तालुक्यात ६६ ग्रामपंचायत च्या निवडणुका होत असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत दोन हजारच्या वर नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
येत्या १८ तारखेला ग्रामपंचायत चे मतदान होत आहे. तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींचा धुराळा उडणार आहे. सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने अनेकांना सरपंच पदाचे स्वप्न पडत आहे. गाव कारभारी होण्यासाठी कित्येकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. दि.२८ नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.परंतु दि.१ आणि २ डिसेंबर रोजी गर्दी करत बहुतांश अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २ डिसेंबर पर्यंत केज निवडणूक विभागात सरपंच पदासाठी एकूण ३५७ तर सदस्य पदासाठी १८०३ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार लक्ष्मण धस यांनी दिली.
दरम्यान छावणीमध्ये किती बाद होतात, कितीजण माघार घेतात हा भाग वेगळा आहे. परंतु दिवसेंदिवस गावचा कारभार हाकण्याची हौस अनेकांना असल्याचे दिसून येत आहे.