ब्रेकिंग
केज शहरातील अवैध धंदे करणारे सैरभैर…..!
केज दि.१४ – केज उपविभागाचे एएसपी पंकज कुमावत हे केज उपविभागाला रुजू झाल्यापासून अनेक धाडसी कारवाया सुरू झालेल्या आहेत. त्या धाडसी कारवायांमध्ये कित्येक अवैध धंदे आणि अवैध धंदे करणारे पुरते सैरभैर झाले आहेत.कित्येक जुगाराचे अड्डे, हातभट्टी दारूचे गुत्ते हे नेस्तनाबूत करण्यामध्ये पंकज कुमावत यांना यश आलेले आहे. मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी ते प्रशिक्षणाला गेले आणि पुन्हा केज तालुक्यामध्ये आणि परिसरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले होते. मात्र मागच्या आठ दिवसांपूर्वी पंकज कुमावत हे पुन्हा रुजू झाल्याने तात्काळ पोलिसी कारवाया सुरू झालेल्या आहेत.
ग्रामीण भागामध्ये चालणारी जुगार अड्डे त्याचबरोबर हातभट्टीचे व्यवसाय यांच्यावर खऱ्या अर्थाने संक्रांत आलेली आहे. पान टपरीवर बे मालूमपणे आणि राजरोसपणे प्रतिबंधित सुगंधित पान मसाला त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांचे गुटखे विक्री केल्या जात आहेत. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पंकज पंकज कुमावत यांनी पान टपऱ्यांवर आपली आता नजर वळवली आहे. मागच्या चार दिवसांपासून पान टपऱ्यांवर पोलिसी धाडी सुरू आहेत. आणि यामध्ये कित्येक हजारोंचा गुटखा जप्त केला असून गुन्हेगारांनाही जेरबंद केले आहे. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी घडला. शुक्रवारी काही पान टपऱ्यावर धाडी टाकत असल्याची गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि इतर पान टपरी धारकांनी तात्काळ आपल्या पान टपऱ्या बंद करून पलायन केले. त्यामुळे केज शहरांमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या वेळेला एकही पान टपरी उघडी नसल्याचे चित्र दिसत असल्याने सर्वसामान्य मात्र संभ्रमात पडले होते. पान टपरी धारकांचे नेमके हे बंदचे आंदोलन आहे की त्यांचा अघोषित काही संप आहे ? याच संभ्रमामध्ये लोक होते. मात्र जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना कळाले की जे पान टपरी धारक गुटखा विक्री करतायेत त्यांच्यावर धाडी टाकणे सुरू आहे तेव्हा मात्र नागरिकांना खरे कारण कळून आले.
दरम्यान, एएसपी कुमावत यांच्या आदेशावरून एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पान टपऱ्या आणि इतर ठिकाणी केलेल्या कारवाया मध्ये शहरातील सुमारे डझनभर गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.त्यामुळे अवैध धंद्यांवाले चांगलेच धास्तावले असून त्यांना पळता भुई थोडी झाली आहे.