आपला जिल्हा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गहिनीनाथ गडावर हजेरी…..!
बीड दि.१५ – जिल्ह्यातील गहीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी आज तेथे भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित नव्हत्या. मंडे भगिणींच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा सोहळा महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या गडावर मुंडे भावंड परंपरेनुसार दरवर्षी एका व्यासपीठावर येतात. मात्र राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्याने यंदा ते या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नव्हते. परंतु, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे यंदा गहिनीनाथ गडावरील हा सोहळा प्रथमच मुंडे कुटुंबीयांशिवाय पार पडला.
गहिनीनाथ गडावरील हा पहिला कार्यक्रम होता की ज्यावेळी मुंडे कुटुंबीयांपैकी कोणीही व्यक्ती व्यासपीठावर नव्हते. धनंजय मुंडे दरवर्षी पहाटेच्या वेळी पूजा करायचे. दर वर्षी ते रात्रीच मुक्कामी गडावर येत असत आणि पहाटे पूजा करून दुपारी बारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. मात्र यावर्षी ते रूग्णालयात उपचार घेत असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, यंदा प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीही सोहळ्याला हजेरी लावली नाही. गहिनीनाथ गडावर येणारी भक्त मंडळी पंकजा मुंडे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे किंवा प्रितम मुंडे या व्यासपीठावर नसणार हे समजल्यानंतर अनेक भाविकांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होण्याआधीच गड सोडला.