क्राइम
केज शहरात एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना…..!
केज दि.३१ – शहरात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून एका घटनेत घराच्या मागील बाजूने चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सव्वा लाख रु. किंमतीचे सोन्याचे दागिने आणि नगरी रोख रक्कम पळवली. तर दुसऱ्या घटनेत छत्रपती शिवाजी चौकातील एका दुकाना समोरील उभा केलेल्या मोटार सायकलच्या डिगगीतून 1 लाख 40 हजार रुपये चोरीला गेले आहेत.
मंगळवार दि. 31 जानेवारी केज तहसीलच्या आवारात बांधकाम विभागाच्या क्वार्टरमध्ये राहत असलेले राऊत यांच्या सरकारी क्वार्टर मधून 20 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि नगदी 5 हजार रुपयाची चोरी झाली आहे. मोहनराव राऊत यांच्या पत्नी आशाबाई राऊत या दुपारी 2 वा. च्या दरम्यान बाजार करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने वॉल कंपाउंड वरून उडी मारुन आत प्रवेश करून घराचा मागील दराचा उघडला. घरात ठेवलेल्या कपाटाच्या चाव्याने कपाट उघड़न त्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 7 ग्रॅम वजनाचे कानातील फुले व झुंबर आणि प्रत्येकी 1.5 ग्रॅम तीन नथन्या असा एकूण 20.5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख 5 हजार रुपये असा मुद्देमालाची चोरी केली.
तर अन्य एका घटनेत मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी 3:45 वा. अभिमान मच्छिंद्र राऊत रा. काळेगाव घाट यांनी कळंब रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून चेकद्वारे 1 लाख 20 हजार रू. काढले. तसेच आयडीबीआय बँकेच्या एटीएम मधून 20 हजार रु. काढले होते त्यांनी ते सर्व पैसे 1 लाख 40 हजार रुपये त्यांच्या स्पेलेंडर प्लस या मोटरसायकल क्र. (एम एच-12 / जीके – 7714) ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पारस स्वीट होम शेजारच्या गणेश मल्टी सर्विसेस समोर गाडी उभा करून ते गणेश मल्टी सर्विसेसचे राऊत यांना बोलत असताना अज्ञात व्यक्तीने डिग्गी उघडून त्यातील 1 लाख 40 हजार रुपये चोरून नेले.
दरम्यान केज शहरात भर दिवसा चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकात घबराट निर्माण झालेली असून पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहेत. तर घरफोडी प्रकरणी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.