क्राइम
एएसपी पंकज कुमावत यांची आणखी एक मोठी कारवाई…….!
बीड दि.4 – जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आणण्याचे काम एएसपी पंकज कुमावत यांनी केले आहे. आतापर्यंत कित्येक मातब्बर गुन्हेगारांना आत टाकले असून कित्येक अवैध धंद्यांचे अड्डे उध्वस्त केले आहेत.आणि याचाच एक भाग म्हणून आणखी एका कारवाईत गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून यामध्ये कुणाचे हात आहेत याचा शोध सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 03/02/2023 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, 04/02 – 2023 रोजी पहाटे ट्रक क्रमांक जीजे 12 ए वाय 94 25 यामध्ये गोवा गुटख्याचा माल बसवकल्याण येथे भरून तो सोलापूर ते बीड रोड ने मांजरसुंबा मार्गे बीड येथे जात आहे. सदरची माहिती त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांना देऊन सदर वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी आज दिनांक 04/02/2023 रोजी पहाटे चौसाळा ते बीड जाणाऱ्या रोडवर उदंड वडगाव येथे रोडवर ट्रक थांबून सदर ट्रक चालक यांना नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव वजीर इम्रान गुल मोहम्मद वव किलन्नर समीर सुलेमान नोतियार असे सांगितले. सदर इसमास ताब्यात घेऊन ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोवा गुटख्याचे 40 मोठे भोद, प्रत्येक भोदा मध्ये चार पोते असे एकूण 160 पोते होते. त्याची किंमत 36 लाख रुपये, ट्रक किंमत पंधरा लाख रुपये, दोन मोबाईल 20000 रुपये असा एकूण 51 लाख वीस हजार रुपयाचा माल ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, विकास चोपणे, संजय टुले, दिलीप गीते, अनिल मंदे, सचिन अहंकारे यांनी केली.