संपादकीय
पत्रकारांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे……!
केज दि.१३ – पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर तालुक्यातील येथे सर्व पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयबीएन लोकमतचे वृत्तनिवेदक विलास बडे, जेष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील मुक्ता लॉन्स येथे दिनांक 12 फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष सीता बनसोड तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह भाजपाचे जेष्ठ नेते रमेश आडसकर, येडेश्वरी शुगर चे चेअरमन बजरंग सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत मुंडे, संतोष हांगे, डॉक्टर योगिनी थोरात, विजयकांत मुंडे,जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी किरण वाघ, सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे,यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम तीन सत्रा मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पहिल्या सत्रामध्ये आयबीएन लोकमतचे वृत्त निवेदक विलास बडे यांनी बदलत्या काळाबरोबर पत्रकारांनाही बदलण्याची गरज असून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच ग्रामीण भागातील तरुण पत्रकारांनी माध्यमांमध्ये आपली ओळख निर्माण करावी त्याशिवाय ग्रामीण भागातील प्रश्न सरकार समोर येणार नाहीत असेही सांगितले. आपल्याकडे जर कौशल्य असेल तर आपण त्याचा उपयोग स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी करावा असेही आवर्जून सांगितले. सध्याचे युग हे अतिशय स्पर्धेचे असून यामध्ये सोशल मीडिया सारख्या माध्यमांचा पत्रकारांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो, तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाची आकडेवारी सांगून संधीची माहिती दिली. मात्र पत्रकारांनी विश्वासार्हता टिकवून ठेण्यासाठी आशय (कंटेंट) महत्वाचा असल्याचा मोलाचा सल्लाही दिला.
तर ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी आपल्या सविस्तर मार्गदर्शनामध्ये स्वतःची कौशल्य विकसित करून पत्रकारितेमध्ये पत्रकारांनी आता नवीन तंत्रज्ञानाची कास धरून स्वतंत्रपणे आपली ओळख निर्माण करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच DIGI9 चे पत्रकार तथा राजकीय विश्लेषक प्रभाकर सूर्यवंशी यांनी यूट्यूब च्या माध्यमातून स्वतंत्रपणे पत्रकारिता करण्याचे तंत्र आणि त्यामधून होणारे अर्थार्जन याची सविस्तर माहिती दिली. तसेच अतिशय कमी मनुष्यबळामध्ये यूट्यूब च्या माध्यमातून आपण पत्रकारिता तसेच अन्य काही प्लॅटफॉर्म निर्माण करू शकतो अशी माहिती दिली.
सदरील कार्यक्रमासाठी केज तालुक्यातील सर्व पत्र कारांची उपस्थिती होती.तीन सत्र मार्गदर्शन झाल्यानंतर सायंकाळी अनिल वैरागे यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते.