आरोग्य व शिक्षण
विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीच्या दिशेने वेळीच पाऊले टाकावीत….!
केज दि.२५ – केवळ ध्येय निश्चित केले आहे असे म्हणून चालणार आहे. विद्यार्थीदशेत असताना वेळीच ध्येयपूर्तीच्या दिशेने पाऊले टाकावीत, असे मत युसूफवडगाव (ता.केज) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी केले.
तालुक्यातील होळ येथील होळेश्वर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी (दि.२४) पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देवानंद मलदोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार शुभम खाडे हे देखील होते. त्यांना कै.त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्यावतीने सन्मानित करण्यात आले. पुढे बोलताना योगेश उबाळे म्हणाले, विद्यार्थीदशेतील दहावी इयत्ता हा महत्वाचा टप्पा आहे. या काळात घडण्याचे आणि बिघडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आई-वडील व गुरुजनांचे ऐकायला हवे. त्यांचा सल्ला हा मौलिक असतो. होळेश्वर विद्यालयातून उच्चपदस्थ अधिकारी घडले आहेत. ही यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवावी, असे उबाळे म्हणाले. यावेळी बोलताना पत्रकार शुभम खाडे म्हणाले, भविष्यात स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अधिक मेहनतीची गरज आहे. विद्यार्थ्याच्या आगामी शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे काम शाळेत होत असते, असे सांगून दहावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. तसेच, कॉपीमुक्तीबाबत शासनाने कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणीही कॉपीचा अवलंब करू नये, परीक्षेतून खरी गुणवत्ता समोर आल्यास पुढील शिक्षण निवडताना सोयीचे ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण करताना मुख्याध्यापक देवानंद मलदोडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल करावे. परीक्षेचे नियोजन करून सामोरे जा. तुम्हाला यश नक्की मिळेल, असे सांगून दहावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रातनिधिक स्वरूपात सत्कार करून निरोप दिला. यावेळी मनोगत पर्यवेक्षिका नंदा शिंदे, विशाल माने, पद्माकर लांडगे, बाळासाहेब खोगरे, इम्तीयाज खतीब, अशोक बनसोडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत शिंदे यांनी केले. सूत्रसंचलन हर्षदा टोंपे, वैष्णवी शिंदे या विद्यार्थीनींनी सूत्रसंचलन केले. स्नेहा राख या विद्यार्थीनीने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.