ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्याच्या घरात मोठी फूट……!
मुंबई दि.१३ – एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेक मंत्री आमदार खासदार पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अमान्य असल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
पुढच्या काही तासांत सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत.सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहे. भूषण देसाई यांच्या निर्णयामुळं शिवसेनेतल्या फुटीनंतर आणखी एका घरात फूट पडल्याचं दिसून येत आहे. भूषण देसाई एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, खासदार गजानन किर्तीकर हे सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. ते सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात भूमिका मांडतं होते. अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर, त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.