महाराष्ट्र
महिलांसाठी आनंदाची बातमी…..!
मुंबई दि.१७ – राज्यातील सर्वच महिलांसाठी घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आजपासून १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. कांही अटी व शर्तीचे पालन करून महिलांना मोफत प्रवास करण्यात येईल.
या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार असून या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, सदर योजनेमध्ये कांही अटी व शर्ती नमूद केल्या असून यामध्ये ज्या महिला ऍडव्हान्स बुकिंग करतील त्यांना ही सवलत मिळणार नाही.तसेच वातानुकूलित सेवाकारांची आकारणी करण्यात येणार आहे.तर सदर सवलत ही शहर वाहतूक बसेस साठी दिली जाणार नाही. यामध्ये महिलांना वेगवेगळ्या रंगाची तिकिटे देण्यात येणार असून यातून किती महिलांनी प्रवास केला याची परिगणना करणे सोपे जाणार आहे.