केज दि.२६ – तालुक्यातील मस्साजोग येथे शौचालयाच्या शोष खड्ड्याचे खोदकाम करताना मातीच्या मडक्यात
पुरून ठेवलेली पुराणकालीन नाणी सापडली आहेत.
केज तालुक्यतील मस्साजोग येथे अमोल लालासाहेब देशमुख यांच्या मालकीच्या जागेत शौचालयाच्या शोषखड्ड्याचे खोदकाम सुरू असताना खोदकाम करणाऱ्या मजुरांना एका मडक्यात ठेवलेले निजामकालीन आणि इंग्रजकालीन पांढऱ्या चांदीसदृश्य धातूची नाणी सापडली. ती सर्व नाणी घर मालकांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती एका गुप्त खबऱ्या मार्फत केज पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशावरून पोलीस कॉन्स्टेबल धनपाल लोखंडे, बाळकृष्ण मुंडे आणि श्रीराम चेवले यांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल ताब्यात घेतला. सर्व नाणी मोजून पाहिले असता एकूण ३०६ नाणी असून या बाबत पुरातत्व विभाग आणि महसूल प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही सुरू आहे.