संपादकीय
केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना मिळणार प्रत्येकी रोख दिडशे रुपये……!
केज दि.31 – राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्याना माहे जानेवारी 2023 पासुन अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150/- रु. रोख रक्कम देण्याची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.त्यानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना तात्काळ माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वस्त धान्य दुकानास APL (केशरी) शेतकरी शिधापत्रिका जोडण्यात अलेल्या असुन दिनांक 24/07/2015 च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार शेतकरी योजनेच्या लाभासाठी RCMS वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांकडुन DBT साठी आवश्यक असलेला बँक खात्याचा तपशिल विहित नमुन्यात ऑफलाईन भरुन घेण्यात यावा. शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा आवश्यक तपशिल दर्शविणाऱ्या पानाची प्रत (बँक खाते महिला कुंटुंब प्रमुखाचे घेणे बंधनकार आहे) तसेच संबंधित शेतकरी यांचा नमुना 8 अ संकलित करावा. शिधापत्रिका धारकाकडुन अर्जासोबत उचित कागदपत्राची / प्रमाणपत्राची पुर्तता करुन घ्यावी. तसेच संकलित केलेली माहिती तात्काळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करावी. सदरील माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांचे कडुन पाठपुरावा सुरु असुन या बाबत कोणही हलगर्जी पणा अथवा टाळाटाळ करुन नये असे निदर्शनास आल्यास आपणाविरुध्द नियमाधिन कार्यवाही करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, केज तालुक्यात साधारणतः बारा हजार संबंधित कार्ड धारक असून त्या कार्डमध्ये जेवढी सदस्य संख्या आहे त्या प्रत्येकांना 150 रुपये प्रमाणे रक्कम मिळणार आहे.सदरील माहिती आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत.