क्राइम
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी…..!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची हत्या करणार असल्याचा इशारा एका संतप्त नागरिकाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील शेतीच्या वादातून हा इशारा देण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून एका कुटुंबावर अन्याय होत असल्याची भावना, कुटुंबियांची आहे. अण्णा हजारे तसेच प्रशासनालाही निवेदने देऊन झाली, मात्र काही कारवाई होत नसल्याचा आरोप सदर कुटुंबाने केलाय. अखेर १ मे महाराष्ट्र दिनाला अण्णा हजारेंचीच हत्या करणार असल्याचा इशारा या कुटुंबातील संतोष गायधने याने दिलाय.

या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या नागरिकाने अशा प्रकारे उद्विग्नतेतून इशारा दिलाय. शेतीच्या वादातून संगनमताने आपल्या कुटुंबावर अन्याय झालाय, असा आरोप त्याने केलाय. शेतीच्या वादातून गटातील ९६ जणांनी संतोष गायधने यांच्या परीवारावर दबाव आणला आहे. कुटुंबावर अनेक खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगतेय, अशी व्यथा संतोष गायधने यांनी मांडली आहे.
शेतीचा वाद आणि खोट्या केसेसच्या भीती गायधने कुटुंबाने अखेर टोकाची भूमिका घेतली आहे. या प्रकरणात त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह वरीष्ठ पोलीस अधिकारी तसेच मंत्र्यांनाही निवेदन दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही काहीच कारवाई झाली नाही, असा आरोप गायधने कुटुंबियांनी केलाय. अखेर या कुटुंबाने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार, असा इशारा श्रीरामपूरातील संतोष गायधने यांनी दिलाय. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. अण्णा हजारेंच्या समर्थकांमधून याचे पडसाद उमटत आहेत.