#Online fraud
असाह्यतेचा गैरफायदा घेत लांबवले 70 हजार….!
केज दि.१९ – व्यक्तीच्या असाहाय्यतेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन लुटणारी टोळी सक्रिय असलेली आपण नेहमीच पाहतो. वारंवार अशा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. आणि असाच एक प्रकार केज तालुक्यामधील एका असाह्य व्यक्तीबरोबर घडला असून त्यांच्या खात्यातून सुमारे 70 हजार रुपये लांबवले आहेत.
केज तालुक्यातील पैठण येथे मागच्या काही दिवसांपूर्वी स्वराज, पार्थ आणि कानिफनाथ ही तीन बालके शेततळ्यामध्ये पाय घसरून पडले आणि त्यामध्ये तिघांचाही त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. यापैकी स्वराज या बालकाचे वडील जयराम हरिभाऊ चौधरी हे मागच्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांचा कमरेखालचा भाग पूर्णतः अपंग झालेला आहे आणि ते अंथरुणाला खिळून आहेत. आतापर्यंत अनेक दवाखान्यांमध्ये उपचार करण्यात आले. परंतु त्यांना आणखीही उभा राहता येत नाही. घरातील आर्थिक बाजू अतिशय कमकुवत असल्याने आणि त्यातच हा दवाखान्याचा खर्च वाढल्याने सदरील कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेलेले आहे. आणि त्यातच पोटचा गोळाही निघून गेल्याने ते जास्तच खचलेले आहेत. मात्र सदरील कुटुंबाला उभारी देण्यासाठी गावातील काही नागरिकांनी त्याचबरोबर काही सेवाभावी संघटनांनी व सक्रिय न्युज च्या माध्यमातून ही त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आणि त्यांचा फोन पे नंबर देऊन या नंबर वर आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार अनेकांनी त्यांच्या फोनपेवर जमेल तशी रक्कम टाकली आणि त्यांना मदतीचा हात दिला. मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी दुपारी त्यांना फोन आला आणि मी सोनू सूद फाउंडेशनच्या कार्यालयामधून बोलत आहे असे सांगितले. तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला सोनू सूद फाउंडेशन तीन लाखाची मदत करणार आहे असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना मी जसे सांगेल तसे तुम्ही करा असे सांगून एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करा आणि तुमच्या मोबाईल नंबर वर आलेले ओटीपी मला सांगा त्यानुसार तुमच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील असे विश्वासात घेऊन सांगितले. मग जयराम चौधरी यांनी प्ले स्टोर मध्ये जाऊन एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड केले आणि पुढील प्रक्रिया संबंधित व्यक्ती सांगेल तशी केली. त्यांच्या मोबाईलवर सहा वेळा ओटीपी आले ते सहाही ओटीपी चौधरी यांनी संबंधित व्यक्तीला सांगितले आणि काही वेळातच चौधरी यांच्या खात्यावरील सुमारे 70 हजार रुपयाची रक्कम सहा टप्प्यांमध्ये लांबवल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला फोन केला आणि माझे खात्यावरील पैसे कमी झाले आहेत असे विचारले असता, तुम्ही काळजी करू नका संध्याकाळपर्यंत सर्व पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील असे सांगितले आणि फोन बंद केला. पुन्हा ज्यावेळेस चौधरी हे संबंधित नंबरवर करू लागले त्यावेळेस तो फोन बंद येऊ लागला आणि आपली पूर्णतः फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी युसूफवडगाव पोलीस स्टेशन गाठले आणि त्या ठिकाणी घडलेला प्रकार सांगितला. परंतु युसुफवडगाव पोलिसांनी त्यांना बीड येथे सायबर क्राईम मध्ये जाऊन तक्रार देण्याचे सांगितले असता चौधरी यांनी बीड येथे सायबर क्राईमला संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान चौधरी हे आर्थिक बाजूने कमकुवत झालेले आहेत. पोटचा गोळाही काळाने हिरावून नेला. अपंगत्व आलेले आहे. आणि अशा असाह्यतेचा फायदा घेऊन त्यांना जी काही आर्थिक मदत झाली होती ती हातोहात लांबवल्याचा हा प्रकार घडलेला आहे. यापूर्वीही तालुक्यामध्ये ओटीपी मागून ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे घडलेले आहेत. मात्र याचा अद्याप तरी शोध लागलेला आहे असे मात्र ऐकिवात नाही. त्यामुळे कुठल्याही एखाद्या अनोळखी व्यक्तीने आपल्याला जर फोन केला आणि बँक विषयक माहिती किंवा इतर काही माहिती विचारली तर सावधानता बाळगण्याची गरज असून आपली फसवणूक टाळणे हे आपल्याच हातात आहे.