केज दि.२४ – केज विकास संघर्ष समिती आणि समस्त केज च्या नागरिकांना अनेक दिवसापासून भूलथापा देत झुलवत ठेवले.तसेच आश्वासनांची पूर्तता न केल्याने केज विकास संघर्ष समितीने आता आरपार भूमिका घेत जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. तसेच नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
केज नगरपंचायत च्या माध्यमातून मागच्या काही दिवसांमध्ये 98 लाख, 76 कोटी अशा प्रकारचा निधी केज शहराच्या विकासासाठी आल्याच्या वल्गना केल्या. त्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजीही केली. आणि नगरपंचायत कार्यालयामध्ये औपचारिक उद्घाटनही केले. मात्र उद्घाटन होऊनही कित्येक दिवस उलटलेले आहेत तरी अद्याप पर्यंत कुठल्याच प्रकारच्या कामांना सुरुवात झालेली नाही. केज शहरातील उमरी रस्त्याचा प्रश्न मागच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी 98 लाख रुपयांचा निधी आलेला असून त्यामध्ये काही मीटरचे काम होणार आणि तिथून पुढचा रस्ता हा आमदार नमिता मुंदडा यांच्या फंडातून होणार अशा प्रकारची जाहिरातबाजी करण्यात आली. मात्र ती केवळ जाहिरात बाजीच ठरली. अद्याप पर्यंत तरी कसल्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे केज विकास संघर्ष समितीने आता शेवटचे आंदोलन म्हणून आर पारची लढाई सुरू केली आहे. केज नगरपंचायत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरू केले असून दोन दिवसांमध्ये सदरील उमरी रस्ता सुरू नाही झाला तर नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही संघर्ष समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी दिला आहे.