हवामान
केज तालुक्यात पसरले दुपारीच अंधाराचे साम्राज्य, वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस…..!
केज दि.२८ – मागच्या एक महिन्यांपासून घोंगावत असलेले अस्मानी संकट थांबण्याचे नाव घेत नाही.वादळी वारा व गारपिटीने शेती पिकांचे पुर्णतः नुकसान झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आज तर केज तालुक्यातील नागरिकांना वेगळाच अनुभव आला असून भर दुपारीच सर्वत्र अंधार पसरला होता.
शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या अगोदरच सर्वत्र झाकाळून आले.संध्याकाळ झाल्याप्रमाणे दृश्य दिसत होते.आणि अवघ्या कांही वेळातच वादळी वाऱ्यासह प्रचंड कडकडाट सुरू होऊन पावसाचे जोरदार आगमन झाले. प्रवाशांनी आपापली वाहने जागच्या जागी उभे करून दिसेल तिथे आसरा घेतला. सुमारे अर्धा ते पाऊण तास केज तालुक्यातील कांही भागात अवकाळी कोसळत होता.
केज तालुक्यातील केळगाव येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याने अगोदरच लोक भयभीत झाले होते. आणि त्यात पुन्हा दुपारीच अंधार पसरल्याचे चित्र दिसल्याने लोक जीव मुठीत घेऊन बसले होते. आज झालेल्या वादळी पावसाने जे कांही उरली सुरली पिके होती तीही पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकरी मोठया संकटात आले आहेत.त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.