ब्रेकिंग
केज शहरात तारांवर तारा आल्याने मोठे नुकसान….!
केज दि.१८ – महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेकदा कित्येकांची घरे जाळलेली आहेत, कित्येक मुक्या प्राण्यांना आपला जीव गमावा लागलेला आहे तर कित्येकदा मनुष्यहानी झालेली आहे. मात्र महावितरणचा कारभार सुधारण्याचे नाव घेत नाही. आणि असाच एक फटका केज शहरामध्ये बसला असून लोंबकळलेल्या तारांचा एकमेकाला स्पर्श झाल्याने शहरातील सहयोग नगर भागातील घरातील विद्युत उपकरणे जळाली आहेत.
केज शहरातील उमरोड भागात अहिल्यादेवी नगर डीपी आहे. सदरील डीपी वरून शेकडो घरांना वीज पुरवठा केला जातो. मात्र त्या डीपीचीही अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्या ठिकाणाहून ज्या घरांना वीज पुरवठा होतो ते पोल आणि त्या पोलवरील तारा निकामी झालेल्या आहेत. सर्वच पोल वरील तारा लोंबकळल्या असून अगदी वाऱ्याची झुळूक जरी आली तरी त्या तारा एकमेकांना स्पर्श करतात आणि घरातील विद्युत पुरवठा उच्च दाबाने झाल्याने विद्युत उपकरणे जळून खाक होतात. अशीच घटना आज ही पाचच्या दरम्यान घडली असून सहयोग नगर भागातील एका लाईन वर तारांचा एकमेकाला स्पर्श झाल्याने सदरील भागातील विद्युत पुरवठा उच्च दाबाने झाला व त्या उच्च दाबाने झालेल्या विद्युत पुरवठ्यामुळे घरातील फ्रिज, टीव्ही आणि इतर विद्युत उपकरणे जळून खाक झालेली आहेत.
संबंधित प्रश्नाविषयी महावितरण कडे अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत परंतु अद्याप पर्यंत हा प्रश्न महावितरण कडून मिटवण्यात आलेला नाही. काही तारा तर अतिशय झिजून गेल्याने तुटण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळे सदरील भागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवालाही धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कॉल न घेतल्याने सदरील प्रश्न त्यांच्यासमोर मांडता आलेला नाही. मात्र कार्यकारी अभियंता श्री. वाघमारे यांनी तात्काळ सदरील भागातील संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन सदरील प्रश्न मार्गी लावावा अन्यथा मोठा धोका होण्याची शक्यता आहे.