आपला जिल्हा
केजची कन्या बनली अधिकारी….!
केज दि.25 – जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील मुंडेवाडी येथील एका गरीब कुटुंबातील मुलीने एमपीएससी mpsc परीक्षेत यश प्राप्त केले आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेले, जिल्हा परिषदेच्या zp शाळेत शालेय पोषण आहार स्वयंपाकी म्हणून आई काम करतेय, आईच्या कष्टाचे चीज करत मुलगी मुख्याधिकारी Ceo बनली आहे.
प्रांजली बाजीराव मुंडे असे त्या मुलीचे नाव आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेलं, त्यामुळे तिच्यासह मोठ्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी आई संगीता यांच्यावर पडलेली. त्यांनी कुटुंबाचा गाडा हाकायचा म्हणून कोरडवाहू शेतीसोबत जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहार स्वयंपाकी म्हणून काम करत दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केलं. प्रांजलीचे प्राथमिक शिक्षण मुंडेवाडी येथे झाले. इयत्ता सहावी-सातवीचे शिक्षण वाघेबाबुळगाव, आठवी-दहावीचे शिक्षण येळंबघाट (ता.बीड) beed येथून तर अकरावी-बारावीचे शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयातून झाले. त्यानंतर तिने पुणे येथील परशुराम विद्यालयात बीए शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पदवीच्या अभ्यासक्रमासोबतच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. कोणत्याही खाजगी शिकवणीचा आधार न घेता स्वतः अभ्यास केला. सन 2020 मध्ये एमपीएससीची पहिली परीक्षा दिली. त्यात ती मुलाखतीपर्यंत गेली, परंतु 6 गुण कमी मिळाल्याने अंतिम यादीत निवड होऊ शकली नव्हती. त्यानंतर तिने खचून न जाता दुसर्या प्रयत्नात एमपीएससी 2021 परीक्षा दिली. त्यात तिला यश आले असून नगरपालिका मुख्याधिकारी -वर्ग 2 म्हणून तिची निवड झाली आहे. ती मुंडेवाडी गावातील पहिली अधिकारी ठरली असून तिच्या यशाबद्दल ग्रामस्थांसह कुटुंबियांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, पदवीसाठी प्रवेश घेतल्यापासूनच मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. कोविड काळात शिक्षणासह स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे सर्वकाही विस्कळीत झाले होते. परंतु त्यानंतर जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत असे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार करत अधिकारी होण्याचा स्वप्न पूर्ण केलं. माझ्या यशाचे श्रेय आई आणि गुरुजनांचे आहे.अशी भावना प्रांजली मुंडे हिने व्यक्त केली.