आपला जिल्हा
ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी रत्नाकर शिंदे यांच्या निवडीमुळे नवचैतन्य……!
केज दि.२७ – तालुक्यातील पिंपळगाव येथील रत्नाकर शिंदे यांनी गावातील शाखा सचिव पदापासून शिवसेनेचे काम हाती घेतले. त्यानंतर दोन वर्षाने तालुका प्रमुख पदावर निवड झाली. त्यांनी दोन दशकापासून तालुका प्रमुख पदावर पक्षाचे निष्ठेने कार्य केले. त्याचे त्यांना फळ मिळाले असून त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर संधी मिळाली आहे.
शिवसेनेचे रत्नाकर शिंदे यांनी १९९९ पासून शाखा सचिव पदापासून काम सुरू केले. त्यानंतर २००१ पासून शाखा प्रमुख पदाचे काम करीत असताना त्यांची २००३ ला तालुका प्रमुख पदावर निवड झाली. तालुका प्रमुख पदावर काम करीत तालुक्यात गाव तेथे शाखा स्थापना करून त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचण्याचे कार्य केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रास्ता रोको, मोर्चे अशा विविध प्रकारच्या आंदोलने करीत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिकवणीप्रमाणे त्यांनी निवडणुकीपुरते राजकारण आणि इतर काळात समाजकारण केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करीत त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करतात. त्यांनी चिंचोलीमाळी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना अपयश आले होते. २० वर्षांपासून तालुका प्रमुख पदावर एकनिष्ठपणे शिवसेनेचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत नुकत्याच रिक्त झालेल्या जिल्हा प्रमुख पदावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवून रत्नाकर शिंदे यांची वर्णी लावली आहे. ते केज, अंबाजोगाई, परळी, धारूर, वडवणी, माजलगाव या सहा तालुक्याचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
——————–
आंदोलनामुळे तुरुंगवास ही भोगला
——————–
शेतकरी व इतर प्रश्नासह पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या आंदोलनामुळे त्यांना चार वेळा तुरुंगात जावे लागले. तर त्यांच्यावर झोपडपट्टी दादा म्हणून ही कार्यवाही केल्याने त्यांनी तीन महिने तुरुंगवास भोगला होता.
——————–
केज तालुक्याला पहिल्यांदा जिल्हा प्रमुख पद
——————–
शिवसेनेच्या स्थापनेपासून बीड जिल्ह्यात अनेक जिल्हा प्रमुख होऊन गेले. मात्र केज तालुक्यातील व्यक्तीची या जिल्हा प्रमुख पदावर निवड झाली नव्हती. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद हे रत्नाकर शिंदे यांच्या रूपाने पहिल्यांदा तालुक्याला मिळाले आहे.