आता कोरोना रुग्णही गैरसोयीबद्दल करू शकणार खंडपीठात तक्रार दाखल
स्वस्त धान्य दुकानांसाठीही दिले निर्देश
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, फौजदारी याचिका सुमोटो फौजदारी याचिका क्रमांक 1/2020 स्वतःहून दाखल करून घेतली असून कोव्हीड19 च्या अनुषंगाने दाखल असून सदर याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयाने दिनांक 31/7/2020 रोजी आदेश पारित केला असून सदर आदेशाची माहिती सर्वांना देणे बाबत निर्देश दिले आहेत. सदरील आदेशाच्या अनुषंगाने covid-19 ची लागण झालेल्या व्यक्तींची देखभाल व औषधोपचाराच्या संदर्भात काही तक्रार असेल तर अशी व्यक्ती या बाबतीत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांची तक्रार लिखित स्वरूपात, पोस्टाद्वारे, ई-मेल द्वारे अथवा वकिलामार्फत दाखल करू शकेल. यामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये आवश्यक वस्तूंचा पुरवठा नसणे, स्वस्त धान्य दुकाना मार्फत कार्डधारकांना आणि इतरांना मालाचा पुरवठा नसणे, रुग्णालयात covid-19 ची लागण झालेल्या व्यक्तीस दाखल करण्यासंदर्भात त्याचे नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी मदत केंद्र नसणे, सक्षम प्राधिकाऱ्या कडून रुग्णालयात दाखल करून घेण्यासंदर्भात मदत न मिळणे, अधिकाऱ्याने सांगूनही एखाद्या रुग्णालयाने covid-19 रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास नकार देणे, रुग्णालयात देण्यात येणाऱ्या औषध उपचार याबाबत काही शंका असल्यास तसेच शासनामार्फत देण्यात येणार्या औषधांचा व इंजेक्शनचा औषधोपचारात डॉक्टरांकडून वापर होत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती तक्रार दाखल करू शकतात. दरम्यान सदरील माहिती जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांना सूचित केले आहे.