शासकीय आणि निमशासकीय सेवेत कार्यरत असणाच्या कर्मचाऱ्यांना एक नियत वय असते. वयाचा तो पल्ला गाठला की सेवानिवृत्ती ! ही सेवानिवृत्ती गाठण्यासाठी अनेकांना खूप कांही करावे लागते. कधी एकदा यातून मुक्त होतो असे अनेकांना वाटते, तर कुणाला सेवानिवृत्ती चा पल्ला जवळ आल्याचेही कळत नाही. ते आपले आपल्या दैनंदिन चाकोरीबद्ध कामात मश्गुल असतात. कुणाला ही कटकट वाटते. तर कुणी घाण्याचा बैल ठरतात. कुणाकुणाला तर आठवण करून द्यावी लागते की, तुम्ही अमुक वर्षी अमुक वेळी सेवानिवृत्त होत आहात. काहींचा दुसऱ्यांच्या सेवानिवृत्ती वर डोळाच असतो. कारण ती जागा सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मिळवायची असते, तर संस्थाचालकांना ती रिक्त जागा भरायची असते. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अर्थपूर्ण मनसुबे ..
जगदीश जोगदंड एका संस्थेच्या चाकोरीबद्ध सेवेतून निर्धारित नियत वयानुसार सेवानिवृत्त होत आहेत. विश्वास बसत नाही. त्यांची शरीर प्रकृती आणि त्यांच्या अॅक्टीव्हिटीज कडे पाहून ते नियत सेवानिवृत्तीच्या वया पर्यन्त पोहोचले आहेत असे वाटत नाही. असो, असतात काही चोरट्या वयाची माणसं. त्यात जगदीशही ! असेच म्हणावे लागेल.
जगदीश सेवानिवृत्त तर नक्की होत आहेत. यात बदल नाही. पण माझ्या समोर प्रश्न आहे तो कशा- कशात सेवानिवृत्त होणार आहे ? “जगदीश एक सेवा अनेक.” जगदीश मैलाचा दगड आहे. तो चौरंगी चिरा आहे. कुठेही, कसाही बसवा, बसणारच ! खेळाचे मैदान असो की कलेचा फड, लेखणीची कसरत असो की काव्य- संगीताची मैफल, की वक्तृत्व, चित्रकला की सूत्रसंचलन, नृत्य असो की अभिनय सर्वत्र आपला प्रभाव दाखविणारा जगदीश या पैकी कोणत्या सेवेतून मुक्त होणार आहे?.
मला असं वाटतं वर्गातील पोरानां तासभर शिकवणाऱ्या वर्गातून जगदीश सेवानिवृत्त होत आहेत. पण बाकी सर्व क्षेत्रांना पूर्णवेळ, मुक्तपणे कोणत्याही बंधनाशिवाय समाजाच्या हितासुखासाठी त्यांच्या जीवनात आनंद भरण्यासाठी जगदीशचे सेवानिवृत्ती नंतर पदार्पण होत आहे. हे स्वागतार्ह आहे.
जगदीश व पत्रकार म्हणूनही लोकमनात रुजले. ते एक प्रभावी वक्ता, पामरांच्या वेदनांना हुंकार देणारे संवेदनशील पत्रकार, भावनाशील कार्यकर्ता म्हणून जगदीश ची ओळख. वेगवेगळ्या मंचावर त्यांची उपस्थिती जणू त्या मंचाचा तो सभासद, क्रियाशील कार्यकर्ता. तिथे परकेपणा कधी दिसला नाही. सूत्रसंचलन करणारा अँकर असो कि विचार मांडणारा परखड वक्ता अगदी तन्मयतेने, जीव ओतून विषयाची मांडणी करताना पाहून जगदीश बद्दल अधिक आत्मीयता वाढते. ती दृढ़ होते. त्यांचे तिथे असने लोकांच्या मनाचा वेध घेते. असा बहुरुपीया दुर्मिळच. जसा त्याचा रंग पक्का तसा त्याचा विचारही पक्काच. .
केवळ शिक्षणच नव्हे अनेक क्षेत्रांचे बाजारीकरण झाल्याचे आपण पाहतो. त्या एका बाजारातून जगदीशचा प्रवेश. त्या विद्या ज्ञानाच्या क्षेत्रातून येतांना तेथील उपद्रवही त्यांनी पाहिलेले. तरिही विद्या-ज्ञान हे जीवनाचे अंग. ते स्वतः सह सर्वांना हितकारक ठरावे या भावनेने त्यांचा प्रवास. त्यास पत्रकारितेची जोड. केवळ घडलेल्या घटनेचा वृतांत देण्यापुरती जगदीशची पत्रकारिता नाही. घडलेल्या घटनेमागील गूढ जगदीशची पत्रकारिता शोधते.
शेतकऱ्याने आत्महत्या केली, कुणाचे घर जळाले, कुणाचा अपघात झाला एवढेच लिहून जगदीशची लेखणी थांबत नाही. या उपद्रवामागे असणाऱ्या वेदनांची संवेदनशीलता त्यांच्या लेखनीतून उतरते. आणि उद्विग्न मनाने या घटनांचा मागोवा घेते. अशी त्यांची पत्रकारिता-
– उजेडाच्या धाकाने अंधार भयभीत होवून पळ काढतो. हे खरे पण आज प्रकाशच अनाथ होताना हा पत्रकार प्रचंड चिडतांना मी पाहिला. जगदीशची लेखनी केवळ लोकांच्या वेदनाना कोरडा हुंकार देते असे नाही. तर आपतग्रस्त, अन्यायी माणूस त्याच्या वेदनेतून मुक्त झाला पाहिजे. यासाठी जगदीशची लेखणी झिजते.
मोहाच्या झाडाखाली या पेशातील अनेकजण विसावतात. जगदीशने मोहाची सावली आपल्यावर कधी पडू दिली नाही आपल्या हिता – सुखासाठी इतरांना दुःखी करणारे अनेकजन आपल्या आवती भवती मिरवतांना आपण पाहतो. अशा दुष्ट प्रवृत्तीच्या संगतीचा परिणाम जगदीशवर झाल्याचे आढळत नाही. जगदीशने ऐहिक सुखापेक्षा माणसं कमावली. अनेक पत्रकारांना लोक भले-बुरे बोलतात. तसे जगदीशच्या बाबतीत ऐकायला मिळत नाही. कदाचित जगदीशने बुद्धीवादी जीवनशैली स्विकारून त्याप्रमाणे आपला जीवनप्रवास करण्याचा संकल्प केला असावा. आज जगदीशला त्यांच्या शिक्षण – सेवेतून सन्मानपूर्वक निरोप मिळतो ; हीच त्यांच्या सेवेची खरी कमाई असावी. असे वाटते.
पूर्णेतील संविधान चळवळीत जगदीशचा सहभाग सुरुवाती पासूनच आहे.दै.सकाळचे मराठवाडा आवृत्तीचे संपादक मा. दयानंद माने यांना कार्यक्रमासाठी आणण्यासाठी त्यांची झालेली घालमेल, धडपड पाहून मी थक्क झालो. त्यांनी श्री. माने साहेबांना किती फोन, किती विनंत्या कार्यक्रमाला येण्यासाठी केल्या ते दयानंद माने यांनी स्वतःच सांगितले. असा हट्टी आणि चिंतातूर जगदीशही मला अनुभवायला मिळाला. पण त्याच्या मुलीच्या लग्नाची बिदाई मोजक्या उपस्थितीत करून लग्नाच्या खर्चाला फाटा देणाऱ्या जगदीश बद्दल मात्र अजूनही मनात खंत आहे. असो. करोनाच्या महामारीच्या काळात लोकांच्या काळजीपोटी असे घडले असावे. असा अंदाज बांधून जगदीश बद्दलची ही खंत मी संपवितो, आणि जगदीशच्या भावी जीवनात सूख-शांती, समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभण्यासाठी मंगल कामना करतो.
प्रकाश कांबळे
पूर्णा,
9423759667