संपादकीय
लेकीचे कौतुक करण्यासाठी अख्खे गाव झाले गोळा…..!
केज दि.६ – तालुक्यातील मुंडेवाडी येथील अतिशय छोट्याशा गावातून आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर प्रांजली मुंडे हिने यशाला गवसणी घातली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ती मुख्याधिकारी पदावर विराजमान झाली आहे. प्रांजलीचे कौतुक करण्यासाठी मुंडेवाडी गावामध्ये सुनील घोळवे यांच्या पुढाकारातून प्रांजलीच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा त्याचबरोबर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा केजचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार सचिन देशपांडे गटविकास अधिकारी राजेश मोराळे, पत्रकार गोविंद शेळके तसेच गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रांजली मुंडे हिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आणि प्रांजलीच्या आईनेही प्रांजलीचे वडिलांचे छत्र बालवयातच हरवलेले असतानाही हार न मानता आपल्या दोन्हीही मुलींना उच्च शिक्षण दिले. आणि प्रांजलीनेही आईच्या कष्टाचे चीज करत एमपीएससीच्या माध्यमातून मुख्याधिकारी पदापर्यंत मजल मारली. आणि तिचे कौतुक गावात व्हावे या उद्देशाने सोमवारी सायंकाळी सात वाजता प्रांजलीच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अख्खे गाव गोळा झाले आणि आपल्या लेकीचे भरभरून कौतुक केले.
यावेळी आमदार नमिता मुंदडा यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर प्रांजलीनेही सत्काराला उत्तर देताना कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला उच्च पदापर्यंत जायचे असेल तर अभ्यासामध्ये नियमितता आणि जिद्द असेल तर ते साध्य होते असा विश्वास व्यक्त केला. आणि आपल्या यशाचे श्रेय तिने आईला समर्पित केले. यावेळी गावातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण गावाला स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.