केज दि.10 – शहरातील बस स्थानकात बसमधून उतरत असलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीच्या पर्समधील दागिन्यांची स्टील डबी अज्ञात चोरट्याने काढून घेतली. या डबीतील ३८ हजार ३९७ रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना २३ मे रोजी दुपारी १२.४५ वाजता होती. पोलिसांनी सुरुवातीला नुसता तक्रार अर्ज घेतला होता. मात्र तक्रारकर्त्याने चकरा मारून गुन्हा नोंदवून घेण्यास भाग पाडले. १५ दिवसाने उशिराने का होईना अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील माजी सैनिक शिवाजी लिंबनाथ राऊत यांच्या पत्नी कल्पना राऊत या २३ मे रोजी सकाळी ८.३० वाजता संभाजीनगर येथून केजला संभाजीनगर ते अंबाजोगाई बसने येत होत्या. त्यांनी येताना जवळील सर्व सोन्याचे दागिने छोट्या स्टील डबीत पर्समध्ये ठेवले होते. दुपारी १२.१५ वाजता बस ही मस्साजोगला आल्यावर पर्समध्ये ठेवलेले स्टीलच्या डबीतील सोन्याचे दागिने होते. दुपारी १२.४५ वाजता बस ही केज बसस्थानकात आली. बसमधून उतरत असताना मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्समधील दागिने ठेवलेली स्टील डबी काढून घेतली. डबीत असलेले ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३० ग्रॅमच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ४ ग्रॅमचा सोन्याचा बदाम असे ३८ हजार ३९७ रुपयांचे दागिने स्टील डबीसह लंपास केली. त्यानंतर माजी सैनिक शिवाजी राऊत हे तक्रार देण्यासाठी केज पोलीस ठाण्यात गेले. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार अर्ज घेतला. त्यांनी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी चकरा मारल्या. शेवटी १५ दिवसांनी का होईना त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या पूर्वीही अनेकदा केज बसस्थानकात चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये महिलांची टोळी असल्याचे निदर्शनास आले होते आणि त्यांना अटकही झाली होती.मात्र पुन्हा केज बसस्थानकात चोरीच्या घटना घडत असल्याने आणि विशेष म्हणजे तिथे पोलीस चौकी असूनही प्रवाशांची चिंता वाढली आहे.