आरोग्य व शिक्षण
केज येथे मोफत 2 डी इको तपासणी शिबीर संपन्न….!
केज दि.१४ – राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमांतर्गत बुधवारी केज शहरामध्ये 0 ते 18 वर्षे वयोगटातील रुग्णांची 2 डी इको तपासणी करण्यात आली. सदरील शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमांतर्गत केज शहरातील बालरोग तज्ञ डॉक्टर दिनकर राऊत यांच्या योगिता बाल रुग्णालयामध्ये 2 डी इको करण्याची सोय असल्याने केज, धारूर आणि वडवणी तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील तपासणी शिबिरामध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉ.नितीन येळीकर, डॉ. सारंग गायकवाड, डॉ. दिनकर राऊत यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी एकूण 42 रुग्णांची तपासणी केली यामध्ये 14 बालकांच्या हृदयामध्ये छिद्र आढळून आले. ज्यांच्या हृदयामध्ये छिद्र आढळून आले आहे त्यांच्यावर पुढील उपचार मोफत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रामेश्वर आवाड यांचीही उपस्थिती होती.