संपादकीय

केवळ सांगाडा रुपी कांही दिवसांपुरते स्मारक म्हणून उभे राहण्याची माझी इच्छा नाही……!

15 / 100

(मी जि. प.मा. शा. केज….थोडं व्यक्त होतेय)

मागच्या दोन दिवसांपासून माझ्याबद्दल तळमळ आणि चिंता व्यक्त करणारे काही माझे लेकरं दिसत आहेत.त्यांनी माझ्या कुशीमध्ये शिक्षणासारखे पवित्र अमृत घेतले आणि तीच कुस आज त्यांच्या डोळ्यासमोर उध्वस्त होताना दिसत असल्याने त्यांची तळमळ आणि चिंता सहाजिक आहे. परंतु बाळांनो आज माझी जी चिंता करतायेत, माझी जी काळजी करतायेत ते ना कुणी पुढारी आहेत ना कोणी उद्योगपती आहेत. त्यामुळे ते केवळ कळकळ व्यक्त करू शकतात हळहळ व्यक्त करू शकतात, इतरांना जागे करण्याचाही प्रयत्न करू शकतात. मात्र ज्यांच्या हातामध्ये मला जीवित ठेवण्याचे अधिकार आहेत त्यांचेच हात आज थरथरत असतील, माझ्याकडे येण्यासाठी पावले त्यांची अडखळत असतील तर इतरांनी कितीही हळहळ व्यक्त केली तरी त्यांच्या हृदयाला पाझर फुटेल असे मला वाटत नाही. आणि म्हणून आज जे माझ्याबद्दल आस्था दाखवतात हळहळ व्यक्त करतात ते केवळ प्रेमापोटी.

            कदाचित काहींना माहीत नसेल मी कोण आहे ? मी काय केलं आहे? का माझ्याबद्दल काही ठराविक लोक हळहाळ व्यक्त करतात? आता माझा जर अंत व्हायचा असेल, माझा जर शेवटच व्हायचा असेल आणि केवळ सांगाडा राहून विद्यार्थी रुपी जीव जर माझ्या माझ्या शरीरातून जाणार असेल तर मलाही स्मारक म्हणून उभे राहण्याची अजिबात इच्छा नाही. कारण मला माहिती आहे काहीच दिवसांमध्ये माझे ते स्मारक सुद्धा नष्ट होईल आणि माझ्या जागेवर माझ्या शरीरावर टपून बसलेले लोक काही दिवसातच मला इतिहास जमा करतील. जेव्हा केव्हा माझ्या अंगा खांद्यावर खेळलेले माझे लेकरं या परिसरातून जातील तेव्हा मी कदाचित त्यांना दिसणार सुद्धा नाही. मात्र एवढं मात्र मी सांगण्याचा आज अट्टाहास करत आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ पाच वर्षांमध्ये मी जन्म घेतला. माझा जन्मच कोणत्या उद्देशाने झालाय याची पुरेपूर मला जाण असल्याने मी ही अगदी थोड्याच दिवसांमध्ये बाळसं धरलं आणि परिपक्व मातेसारखं मी माझं कर्तव्य सुरू केलं. आणि माझ्या जोडीला जे समाजाची कळकळ आणि दिन, दलित, दुबळ्या, वंचित घटकातील लेकरांनीही शिक्षणासारख्या अमृताचा आस्वाद घ्यावा अशा उद्देशाने प्रेरित झालेले आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे हात माझ्या मदतीला धावून आले. आणि ते हात अहोरात्र मेहनत घेत होते. माझ्याकडे एक ज्ञान मंदिर म्हणून पाहत होते. त्यांनी माझी आईसारखी काळजी घेतली आणि काही दिवसातच हजारो लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळू लागली. मीही त्यांना माझ्याकडे जेवढ आहे तेवढे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनीही आत्मसात केलं आणि माझ्याकडे जेवढं होतं तेवढं घेतल्यानंतर पुढे त्यांचं मार्गक्रमण सुरू झालं. आणि आजही माझ्या ते स्मरणात आहेत.तर महाराष्ट्राच्या पटलावर मानाचे स्थान भूषवलेले माझे लेकरं पाहिल्यानंतर माझा उर अगदी अभिमानाने भरून येतो. आणि मी तर केवळ त्यांना आसरा निवारा देण्याचं काम केलं. मला आजही आठवत आहेत पत्की, कदम, रहेकवाल, हुलसुलकर, बेलुर्गीकर अशा माझ्या जीवाच्या शिक्षक माणसांनी कित्येक लेकरांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे.
               बरीच वर्ष या केज तालुक्यातील हजारो लेकरांनी माझ्याकडे येऊन अगदी अधिकाराने हक्काने माझ्याकडून जे जे मिळेल ते ते घेतलं. मात्र काही वर्षांनी यामध्ये थोडासा बदल होऊ लागला. मध्यंतरीच्या काळामध्ये राजकारण रुपी एका महत्त्वाकांक्षाने समाजामध्ये शिरकाव केला आणि राजकारणातून व्यापार अशा काही गोष्टी समोर येऊ लागल्या. सरकार येऊ लागली जाऊ लागली आणि याच सरकारमध्ये अनेक विचारवंतांनी शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि तो बदल म्हणजे मोठ्या प्रमाणावर शाळांना मान्यता देऊन सुरू करण्यात आला. अगदी काही दिवसांमध्येच माझ्या आजूबाजूला कित्येक शाळांची उभारणी झाली आणि जे पूर्णपणे माझी लेकरे माझ्या पायऱ्या चढत होती त्यांच्यामध्ये विभागणी होऊ लागली. एवढेच नव्हे तर वर उल्लेख केलेले ज्ञानदानाचे कार्य करणारे काही माझे सारथी वयोमानानुसार निवृत्त झाले आणि पुन्हा जे काही नवीन सारथी आले त्यांच्या अंगाला राजकारणाचा दर्प येऊ लागला आणि त्याच वेळेस मीही ओळखलं की आता आपले अस्तित्व केवळ सांगाडा म्हणून राहण्यास सुरुवात झाली. आणि झालं ही तसंच. वर्षानुवर्ष माझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या माझ्या लेकरांचा सहवास संख्यात्मक रित्या झपाट्याने कमी होऊ लागला. जे पुढे गेले होते त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. आणि जे काही होते त्यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणावर विभागणी झाली आणि अवघ्या काही दिवसांमध्येच मला घरघर लागली. अगदी शहराच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर माझं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा मी प्रयत्न केला. मात्र जे मला टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत होते ते थोडेसे दुरावले आणि ज्यांना माझं महत्त्व माहित नाही, ज्यांना मी काय कष्ट घेतलेत हे माहीत नाही त्यांचा अलगद शिरकाव माझ्या शरीरामध्ये झाला. आणि त्यांनी मला पोखरायला सुरुवात केली. समाज, प्रशासन यांना मी दोष देणार नाही. परंतु पुढे पुढे जे काही धोरण अमलात येऊ लागली त्याचाही परिणाम माझ्यावर नक्कीच झालेला आहे. जे काही माझ्याकडे लेकरं होती त्यांना थोपटणारे हात हेही कमी पडू लागले. शिक्षण विभागाने सुद्धा माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि केवळ तीन-चार शिक्षकांवर माझी बोळवण सुरू झाली. आणि याचा परिणाम पालकांच्या लक्षात आला आणि त्यांना सहज पर्याय उपलब्ध होत असल्याने त्यांनी माझ्याकडे येण्याचा मार्ग बदलला. आणि का बदलू नये ? जर त्यांच्या लेकरांना माझ्याकडून काही मिळत नसेल तर त्यांनी का बरं माझ्याकडे यावं? त्याबद्दल मला कसल्याही प्रकारचा आकस किंवा कसल्याही प्रकारचं कमीपणा वाटत नाही. आणि आज पाहताय माझी काय अवस्था झाली? सांगाडा रुपी मी उभी आहे. मात्र आणखी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगावी वाटते. ज्यावेळेस माझ्या अंगा खांद्यावर हजारो लेकरं खेळत होती त्यावेळेस माझ्यावर संकट सुद्धा अनेक आलेली आहेत. एकदा तर माझ्या डोक्यावर वीज कोसळली मात्र त्या संकटातूनही मी उभी राहिली. एवढेच नव्हे तर मागच्या काही वर्षांपूर्वी मला जाळून टाकण्याचाही प्रयत्न झाला होता. तरीही मी माझं अस्तित्व टिकवून ठेवलं.
                  मात्र काळ बदलत जातो, संकल्पना बदलतात, विचार बदलतात त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्यावरही झालेला आहे. आणि म्हणून आज मी केवळ सांगाडा रुपी आहे. शरीरात विद्यार्थी रुपी जीवच नसेल तर राहण्यात अर्थ नाही अशी अवस्था आज माझी झालेली आहे.
                  मात्र माझ्यानंतर जी काही ज्ञान मंदिरे माझ्या आजूबाजूला उभी राहिली ती मात्र दिवसेंदिवस वाढू लागलेली आहेत. मग नेमकं चुकलं कुठे.परंतु माझ्याकडेही आपण सर्वांनी, माझ्या चालकांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर माझी अवस्था ही आज अशी झाली नसती. एवढंच काय ज्यावेळेस हजारो लेकरं माझ्या अंगा खांद्यावर खेळत होती त्यावेळेस लेकरही भरपूर होती. आणि सहाजिकच लोकसंख्येवर नियंत्रण येऊ लागलं आणि त्या नियंत्रणाचा परिणाम माझ्यावर दिसणे साहजिक आहे. पूर्वी जेवढे लेकरं माझ्याकडे येत होती तेवढे येणे शक्य नाही. मात्र माझा श्वास सुरू राहावा एवढे जरी पाखरं माझ्याकडे आली तरी मी अगदी त्यांना पूर्वीप्रमाणेच प्रेम देईल, आस्थेने त्यांना आसरा देईल.मात्र मायबाप सरकारने एवढेच करावे की माझ्याकडे येणाऱ्या लेकरांना थोपटण्यासाठी पुरेशा हाताची आणि इतर काही थोड्या सोयी सुविधांची तजवीज करावी. यापुढेही मी माझी सेवा आणि माझं कर्तव्य नक्कीच सुरू ठेवेल.मात्र केवळ चर्चा करून, माझा इतिहास सांगून गप्प बसण्यापेक्षा काहीतरी करणे हे गरजेचे आहे. तरच मलाही राहण्यामध्ये आनंद आहे. आणि जर केवळ तुम्ही चर्चाच करणार असाल आणि केवळ माझ्या सांगाड्याकडेच पाहत बसणार असाल तर तो सांगाडा ही माझा नामशेष करा आणि ज्यांना माझ्याबद्दल आस्था नाही अशांच्या घशात घाला आणि व्हा मोकळे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close