कदमवाडी ( ता. केज ) येथील परशुराम वचिष्ठ कदम ( वय २७ ) व गावातील सिद्धेश्वर रामेश्वर कदम, अमोल कल्याण कदम, अमर धनराज कदम हे चौघे २० जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कदमवाडी शिवारातील शेतात बोलत उभे होते. त्यांनी अमोल कदम याच्या भांडणात का पडलास ? अशी कुरापत काढून शिवीगाळ करीत अमोल याने जवळ पडलेला दगड उचलून परशुरामच्या गालावर मारल्याने त्याची दाढ पडून गंभीर दुखापत केली. दोन्ही पायावर दगडाने मारहाण करून जखमी करीत त्यानंतर जमिनीवर पाडून दगडाने दोन्ही छातीत, खांद्यावर, मांडीवर मारहाण केली. तर सिध्देश्वर याने लाथाबुक्याने मारहाण करून जिबे मारण्याची धमकी दिली. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन आल्यानंतर परशुराम कदम याने दिलेल्या तक्रारीवरून सिध्देश्वर कदम, अमोल कदम, अमर कदम या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार महावीर सोनवणे तपास करताहेत.