ब्रेकिंग
”त्या” मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी होणार …..!
केज दि.२६ – येथील उपजिल्हा रुग्णालयात एका १३ वर्षीय मुलीला उलटी, संडासचा त्रास होऊ लागल्याने ऍडमिट करण्यात आले होते. हसत खेळत असलेल्या मुलीचा काही तासाने मृत्यू झाला. तिचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व तिला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ही केली आहे.
धारूर तालुक्यातील जहागीरमोहा येथील सतीश सिरसट हे पत्नी, तीन मुली, दोन मुलांसह केज शहरातील अल्लाउद्दीन नगर भागात वास्तव्यास असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सतीश सिरसट हे चार दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. त्यांची थोरली मुलगी सोनाली सतीश सिरसट ( वय १३ ) ही येथील नालंदा विद्यालयात इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सोनाली हिला २४ जून रोजी सकाळी उलटी, संडास व पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिची आई शितल सतीश सिरसट यांनी सकाळी १० वाजेच्या सुमारास तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिला बाह्यरुग्ण विभागात तपासणी करून डॉक्टरांनी तिला बालरोग विभागातील वॉर्डात अंतर रुग्ण म्हणून ऍडमिट केले. मात्र तेथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला व्यवस्थित तपासून तिच्यावर योग्य उपचार केला नाही. तसेच डॉक्टर वॉर्डात नव्हते. तिला जास्त त्रास जाणवू लागल्याने तिची आईने डॉक्टरांना शोधत इतरत्र फिरत होती. मात्र डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे तिचा दुपारी २ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अशी तक्रार मयत सोनाली सिरसट हिची आई शितल सिरसट यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी व पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तर तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हयगय व निष्काळजीपणा करून तिला योग्य औषधोपचार केला नसल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शितल सतीश सिरसट यांनी केली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशावरून फौजदार राजेश पाटील, जमादार रुक्मिण पाचपिंडे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मयत सोनाली सिरसट हिचे उपजिल्हा रुग्णालयात २५ जून रोजी शविच्छेदन करण्यात आले आहे.
————————————————
माझी मुलगी रुग्णालयात हसत – खेळत होती. मात्र काही तासात तिला वेळेवर योग्य औषधोपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. माझ्या मुलीच्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार त्या वॉर्डातील डॉक्टर आहेत. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
शितल सतीश सिरसट
मयत मुलीची आई
————————————————
सोनाली हिच्यावर उपचार सुरू असताना दुपारी तिने बाहेरचा वडापाव सेवन केला होता. त्यामुळे तिला उलटी होऊन त्या अन्नाचे कण श्वसन नलिकेत अडकल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच मयत मुलगी सोनाली हिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्या बाबत न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
डॉ. संजय राऊत,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, केज.