महामंडळासोबतचा करार न वाढल्याने खासगी शिवशाही गाड्यांना ‘ब्रेक’ लागला. खासगी आरामगाड्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी संपूर्ण वातानुकूलित शिवशाही गाड्यांची संकल्पना एसटी महामंडळाने अंमलात आणली होती. 2018 पासून राज्यभरात शिवशाहीची दौड सुरू झाली होती. थोड्याफार जादा पैशांत थंडगार व आरामदायी प्रवास करता येत असल्याने प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषत: पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर आदी मार्गांवर शिवशाही भरभरून धावत होत्या. 2021 मध्ये करार संपल्याने महामंडळाने तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती, ती देखील 30 जूनच्या रात्री संपली. गेल्या महिनाभरात कंपनीने 100 गाड्या टप्प्याटप्प्याने एसटीच्या सेवेतून काढून घेतल्या. 30 जूनच्या रात्री पूर्णत: सेवा बंद केली. त्यांचे काही चालक कंत्राटी स्वरूपात एसटीकडे रुजू झाले.
दरम्यान, खाजगी शिवशाही गाड्यांना एसटीकडून प्रतिकिलोमीटर 29 रुपये शुल्क दिले जायचे. त्याशिवाय डिझेल पुरवठा आणि वाहक एसटीचा असायचा. गाडीची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता व चालक ही जबाबदारी संबंधित कंपनीची होती. खाजगी शिवशाहीची उणीव भरून काढण्यासाठी आता शिवाई गाड्या येणार आहेत. काही आगारांत त्या दाखलही झाल्या आहेत. या गाड्या विजेवर धावणार्या असून, संपूर्ण वातानुकूलित आहेत.