ब्रेकिंग
राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या दिग्गजांनीही सोडली शरद पवारांची साथ….!
पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याचं मोठं बंड केलं होतं. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे 30 आमदार गेले आणि भाजपा बरोबर सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्या अगोदर विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार यांनीही बंड केलं होतं आणि भाजपा बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र अवघ्या 80 तासांमध्ये ते सरकार कोसळलं आणि पुन्हा अजित दादा राष्ट्रवादीमध्ये परत आले. या सर्व गोष्टीमागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात होता अशा चर्चा होऊ लागल्या. मात्र तेव्हापासून अजित पवार हे नाराज असल्याच्या नेहमीच चर्चा घडत असत. मात्र अजित पवारांनी वेळोवेळी नाराज असल्याचा इन्कार देखील केला.
मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा गदारोळ उठला. मात्र त्यावेळी असेच झाले आणि काही तासांच्या आत आपला राजीनामा परत घेतला. त्यावेळेसही अजित पवार मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर अजित दादांनी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केले तेव्हा तर अजित पवार हे कमालीचे नाराज दिसून येत होते. आणि अवघ्या काही दिवसांमध्येच पुन्हा आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत होती आणि यामध्ये ठरणार होतं की प्रदेशाध्यक्ष करायचे कुणाला ? मात्र अचानक जादूची कांडी फिरली आणि अजित पवार थेट राजभवनावर दाखल झाले. आणि त्यांच्या समवेत एक दोन नव्हे तर तब्बल 40 आमदार राजभवनावर दाखल झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल झाले. त्यांच्या समवेत देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर शिंदे गटाचे सर्व मंत्री, आमदार आणि बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ही राजभावनावर दाखल झाले आणि काही वेळातच या ठिकाणी शपथविधीचा सोहळा संपन्न झाला आणि यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सरकारमध्ये सामील होण्याचा मोठा निर्णय घेतला. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनंतर सर्वात मोठे खिंडार जर कोणाला पडले असेल तर ते पडले राष्ट्रवादीला.
राष्ट्रवादीमध्ये असलेली खदखद पुन्हा समोर आली आणि अजित दादांनी धडाकेबाज निर्णय घेत भारतीय जनता पार्टी शिवसेना या सरकारमध्ये सामील होण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. विशेष या गोष्टीचे काहींना वाटले की जे, अगदी शरद पवारांच्या विश्वासू यादी मधले आहेत मग ते छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, प्रफुल्ल पाटील असतील, नरहरी झिरवळ असतील हे सुद्धा आजच्या शपथविधीला उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम,अदिती तटकरे,संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. आणि याचाच अर्थ राष्ट्रवादी पूर्णपणे फुटल्याचे यावेळी दिसून आले. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आमचा या शपथविधी ला आमचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी ची बैठक सुरू झाली असून सरकारमध्ये गेलेले 80 टक्के आमदार परत येतील असा दावा करण्यात आला आहे.