संपादकीय
या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मतालाही तेव्हढीच किंमत आहे…..!
केज दि. तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे रस्त्या अभावी अक्षरशः हाल सुरू आहेत. कालच सक्रीय न्युज च्या माध्यमातून काळूचीवाडी येथील ऊसतोड मजूर ग्रामस्थांनी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च करून स्वतःच रस्ता तयार केल्याचे वृत्त आपण पाहिले. तर त्याच भागातील तरनळी ते तांदळे वस्ती या रस्त्याची झालेली आहे.
तरनळी – सानप वस्ती ते तांदळी वस्ती या रस्त्यावर मागच्याच उन्हाळ्यामध्ये लाखो रुपये खर्च करून एक किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण केले. बजेट किती होते ? रस्ता कुठपर्यंत तयार करायचा होता ? हे गावकऱ्यांना माहित नाही. मात्र एक किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण झाल्याचे त्यांनी पाहिले. रस्ता बनवत असताना डब्बर टाकले परंतु त्यावर माती मिश्रित मुरूम टाकल्याने पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची गुणवत्ता किती निकृष्ट दर्जाची आहे हे समोर आले. सदरील रस्त्यावर दोन्ही बाजूला दोन-तीन मोठ मोठ्या वस्त्या, प्राथमिक शाळा आहेत आणि त्या वस्तीवरील काही बालके हे बाहेरगावी ही शिक्षणाला ये जा करतात. परंतु वाहनच काय पायी चालणे ही मुश्किल झाल्याने शाळेच्या बसेस किंवा अन्य वाहने त्या रस्त्यावरून जाऊ शकत नाहीत. काही जणांनी वाहने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वाहनांची काय अवस्था झाली ती आपल्याला फोटोमध्ये दिसून येते. मागच्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कुठल्याच प्रकारचे वाहन त्या ठिकाणी जात नसल्याने दवाखाना असेल किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तेव्हा सुद्धा अगदी लोकांना दवाखाना जवळ करणे हे अडचणीचे जाते. केज तालुक्यातील हा एवढाच रस्ता नाही तर तालुक्यामध्ये बहुतांश गावांना जोडणारे जे छोटे मोठे रस्ते वाड्या, वस्त्या तांड्याला जोडणारे असतील ते अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याने तिथल्या लोकांना संघर्ष करत जीवन कंठावे लागत आहे. आणि हे सर्व गोष्टी स्थानिक लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्याने पाहतायत. मात्र या नागरिकांना दिलासा दिला पाहिजे असा विचार अद्याप तरी कोणाच्या मनात आलेला दिसत नाही. आणि म्हणून वाड्यावर डोंगरदरीमध्ये राहणारे हे सुद्धा माणसंच आहेत, त्यांच्याही मताची किंमत आलिशान बंगल्यामध्ये राहणाऱ्या नागरिका एवढीच आहे एवढं जरी स्थानिक लोकप्रतिनिधींना लक्षात आलं तरी मोठी गोष्ट आहे.