#Crime
पुन्हा केज तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी काढले डोके वर….!
केज दि.९ – मागच्या काही दिवसांपासून केज तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये चोरट्याने आपला मोर्चा वळवलेला आहे. माळेगाव, सुर्डी फाटा या ठिकाणी चोरी झाल्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याचे शेतीतील चक्क सोलार पंप चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी केज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील नामेवाडी येथील रामदास माणिक वायबसे यांनी आपल्या शेतीमध्ये सोलार पंप बसवला होता. मात्र दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी शक्ती कंपनीचा पाच प्लेटसह सोलार पंप चोरून नेला. अगोदरच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला असून कुठल्या ना कुठल्या प्रकारे असे संकते नेहमीच शेतकऱ्यावर येत आहेत. आणि त्यात पुन्हा चोरटेही डाव साधत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा सोलार पंप चोरून नेल्याने वायबसे हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सदर प्रकरणी केज पोलीस तपास करत आहेत.