शेती
हुमणी अळीने ऊसाला घेरले तर डुकरांचा उपद्रही वाढला….!
केज दि.22 – (बळीराम लोकरे) तालुक्यातील माळेगाव परीसरात सध्या पावसाचा खंड पडल्यामुळे ऊस पिकात हुमणीचा अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.हुमणी अळी ऊसाचे मुळे खात आहे तर ती अळी खाण्यासाठी डुकरं ऊसाची ठेंबडी पोखरून टाकत असल्यामुळे ऊस उन्मळून पडत आहे त्यामुळे ऊसाचे फड च्या फड अळी व डुकरे फस्त नुकसान करत आहेत परिणामी ऊस शेंडा ते बुड अक्षरशः वाळून जात असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. शेकडो हेक्टर ऊस संकटात सापडला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
मागील चोवीस दिवसापासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन सह इतर पिके संकटात सापडले असतानाच भरवशाचे पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या ऊसाला सुध्दा फटका बसला आहे.पावसाची असमानता अचानक हवामानात होणार बदल यामुळे ऊस पिकाची वाढ खुंटली आहे,अशावेळी हुमणी अळी व डुकरं डल्ला मारून नुकसान करत असल्याने समस्येत भर पडली आहे.हुमणी अळीचा खोडवा ऊसात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.या अळीची उत्पत्ती व वावर जमिनीत खोलवर होत असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण मिळणे अवघड आहे.हुमणी चा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रातील उत्पादनात ३० ते ४० टक्के इतकी घट होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.दरम्यान कृषी सहायक कमलाकर राऊत यांनी सोमवारी (दि २१)बाधित क्षेत्राची पाहणी करून हुमणीच्या नियंत्रनासाठी उपाययोजना सुचवल्या.
असे करा हुमणी अळीचे नियंत्रण
” फीप्रोनील ०.३% दाणेदार २५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणात जमिनीत ओल असताना द्यावे.तसेच फीप्रोनील ४०% + इमिडाक्लोपीड ४०% हे संयुक्त कीटकनाशक ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून उसाच्या झाडाभोवती अळवणी करावी”