आपला जिल्हा
डीजे आपली संस्कृती नाही, पारंपरिक वाद्यांच्या साथीने करा विसर्जन….!
बीड दि. २७ (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात डीजे वाजविणे ही आपली संस्कृती नाही, पारंपरिक वाद्य जसे ढोल, ताशे, झांज यांचे आवाज ऐकायला देखील बरे असतात, त्यामुळे डीजेवर बंदी नसली तरी पारंपरिक वाद्य वापरून गणेश विसर्जन करावे, जेथे डॉल्बी वापरली जाते तेथे आवाजाच्या मर्यादा पाळल्या जाव्यात असे प्रतिपादन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.
‘प्रजापत्र च्या गणेशोत्सवाचा समारोप बुधवारी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या उपस्थितीत झाला. संपादक सुनील क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात वृत्तपत्र वितरकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण चांगले पायंडे पा डले पाहिजेत. विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी नसली तरी त्यांना आवाजाच्या मर्यादा पाळाव्या लागतील. मात्र मुळातच डीजे हि आपली संस्कृती आहे का ? तर नाही, त्या ऐवजी पारंपरिक वाद्ये वापरली तर ते अधिक उठून दिसेल, मंडळांनी याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
तसेच यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकांनी वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी नगरपालिकांनी ट्रॅक्टर ला तलावाचे स्वरूप दिले असून ताडपत्रीचा वापर करून ट्रॅक्टर मध्ये पाणी भरून ते ट्रॅक्टर नागरिकांच्या घरोघरी फिरवले जाणार आहेत. नागरिकांनी त्यात गणेश विसर्जन करून सहकार्य करावे असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक प्रश्न आहेत. त्यात शेतकरी आत्महत्या हा महत्वाचा विषय आहे. एकंदरीतच सर्वच शेतकऱ्यांसाठी शेती सोबतच जोडधंदे आवश्यक आहेत. जेथे जोडधंदे आहेत, त्या आष्टी तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण नगण्य आहे. म्हणूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीमशेती असेल किंवा दुग्ध व्यवसाय यांच्या माध्यमातून जोडधंदे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य राहील. आम्ही जेव्हा शेतकऱ्यांनी उसतोडणीला जाऊ नये असे म्हणतो, त्यावेळी त्यांना गावात रोजगार उपलब्ध करून देणे देखील प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करत आहोत असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
दरम्यान, बीड जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या देखील अधिक आहेत. जर आमचे बालविवाह झाले असते तर आम्ही आज या पदावर येऊ शकलो असतो का ? हेच मी जिथे संधी मिळेल तिथे सांगते. मागच्या काळात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली आहेत, मात्र यासाठी समाजाच्या सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगितले.