#Social

राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे सन्मानित…….!

8 / 100
केज दि.३ – राष्ट्रीय पातळीवर मानवावर होणारे अन्याय थांबवून, न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारी, प्रत्येक समाजातील घटकांचे हक्क व अधिकारांचे रक्षण करणारी संघटना म्हणजे “नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम” होय…! या फोरम तर्फे समाजातील शैक्षणिक विभागातील कला, क्रीडा, शिक्षण इत्यादी क्षेत्रात बहुमोल योगदान दिलेल्या मान्यवरांना रविवार, दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ कर्नल गणपती श्रीनिवासन यांच्या हस्ते व गोरख देवरे, भाऊसाहेब अकलाडे आणि ईश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन गौरविण्यात आले. त्यात कृषि महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांचा समावेश आहे.
               कृषि महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी सुरूवातीपासूनच सामाजिक, पर्यावरणीय व  सांस्कृतिक या कार्याबरोबरच त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम घेऊन शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव म्हणून डॉ.ठोंबरे यांना धुळे येथे रविवार, दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी “डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक या राज्यस्तरीय पुरस्काराने” सहकुटुंब गौरविण्यात आले. डॉ.ठोंबरे यांच्या कृषि, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण संवर्धन यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या अभिनव संकल्पना आणि विविध उपक्रमांची तसेच भरीव व उल्लेखनीय अशा सृजनशील कार्याची दखल घेऊन यापूर्वी डॉ.ठोंबरे यांना “भारतीय कृषि व उद्यान संशोधन विकास संस्था चंदीगड पंजाब” या संस्थेच्या वतीने “जीवनगौरव पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच त्यांना विद्यापीठाचा आदर्श प्राध्यापक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार, पर्यावरणाचा सुंदरलाल बहुगुणा पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, वृक्ष मित्र पुरस्कार, देशी गोवंश लेखन पुरस्कार इ.विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. “वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती !” या कविवर्य बा.भ.बोरकरांच्या काव्यपंक्ती सार्थ ठरविणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब माणिकराव ठोंबरे हे होय. डॉ.ठोंबरे यांची एक शिस्तप्रिय, कार्यकुशल अधिकारी म्हणून सर्वदूर ओळख आहे. सर्व वयोगटातील सहकार्यांना सोबत घेऊन जाण्याचे त्यांचे दृष्टे नेतृत्व व कौशल्य वाखाण्याजोगे आहे. शिस्तप्रिय, कठोर, एक उत्तम प्रशासक, समन्वयक, व्यवस्थापक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे.
        उंदरी सारख्या (ता.केज,जि.बीड) आडवळणाच्या एका गावखेड्यात आणि एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्मलेले एक उमदे व्यक्तीमत्व, आपल्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उरात एक ध्येय बाळगून, सोबत आई – वडिलांच्या संस्कारांची शिदोरी, ज्येष्ठांचे आशिर्वाद घेऊन शिक्षणासाठी घराबाहेर पडले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून कृषि पदवी घेऊन मुहूर्तमेढ रोवली व पुढे “पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय” या विषयात “आचार्य” ही पदवी घेतली. आज ते लातूर येथील कृषि महाविद्यालयाचे ‘सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य’ या पदावर कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते कृषि महाविद्यालय अंबाजोगाई येथे ही याच पदावर कार्यरत असताना त्यांनी अत्यंत उल्लेखनीय असे कार्य केले आहे. कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच त्यांनी कोरोना (कोवीड) या आपत्तीच्या काळाला एक संधी समजून महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, अटल घनवन वृक्ष लागवड, योगा पार्क इत्यादी विविध संकल्पना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन महाविद्यालय व परिसरात राबविल्या. अत्यंत अल्पावधीत एकूण २६ हजारांहून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर कृषि महाविद्यालयासमोर अत्यंत देखणे, नयनरम्य आणि रमणीय (गार्डन) बगीचा निर्माण करून महाविद्यालयाची शोभा वृद्धिंगत केली आहे. संस्थेशी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, विचारवंत, व्याख्याते, कवी, समाजसेवक यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडवून आणले व संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जोडले व अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालय खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले. कृषि व कृषिपूरक क्षेत्रात ही प्राचार्य डॉ.ठोंबरे यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी देशी गोवंश, म्हैसवर्ग व शेळी – मेंढी पालनात जे विशेष संशोधन केले ते शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरलेले आहे. राष्ट्रीयस्तरावर शेतकरी, पशुपालक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळावे व चर्चासत्रे यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. तसेच दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिके, दैनिके याद्वारे जनजागृती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सातत्याने भरीव योगदान दिले आहे. आणि सातत्याने ते देत आहेत. त्यांच्या याच समाजोपयोगी, भरीव कार्याची दखल घेऊन आत्तापर्यंत डॉ.ठोंबरे यांना अनेक विभागीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
             दरम्यान, डॉ.ठोंबरे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी, माजी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.उदय खोडके, संचालक विस्तार शिक्षण डॉ.धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ.पी.के.काळे, ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, माजी कुलसचिव डॉ.दिगंबर चव्हाण, डॉ.धिरजकुमार कदम, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर, प्राचार्य वसंतराव चव्हाण, प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, डॉ.अनिलकुमार भिकाणे, डॉ.हेमंत पाटील, पं.उद्धवबापू आपेगावकर, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, वसंतराव मोरे, ऍड.माधव जाधव, ऍड.संतोष पवार, सुप्रसिद्ध लेखक सर नागेश जोंधळे, जेष्ठ कवी राजेंद्र रापतवार, पत्रकार रणजित डांगे, विनोद पोखरकर, पत्रकार दिलीप अरसूळ, प्रख्यात कवी राजेश रेवले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र, परिवार आणि नातेवाईक यांनी अभिनंदन करून पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close