व्हायरल
स्पष्टीकरण देऊनही लोकांचा विश्वास बसलेला नाही…..!
केज दि.१३ – मागच्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यामधील एका मल्टीस्टेटच्या ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे. मल्टीस्टेट मध्ये ठेवलेल्या आपल्या ठेवी असुरक्षित झाल्या असल्याच्या भावनेतून सदरील मल्टीस्टेट मधून आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेटच्या समोर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी रांगा लावलेल्या आहेत. आणि याचाच भाग म्हणून केज शहरातील कानडी रोडवर असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या समोर शुक्रवारी पहाटपासूनच ग्राहकांनी रांगा लावल्यामुळे कानडी रोडवर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली आहे.
कुटे ग्रुपच्या तिरूमला उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानराधा नावाने मल्टीस्टेट सुरू केलेल्या आहेत. सदरील मल्टीस्टेट मध्ये कोट्यावधींच्या ठेवी ग्राहकांनी ठेवलेल्या. आहेत परंतु मागच्या दोन दिवसांपूर्वी आयकरची तपासणी कुटे ग्रुपच्या उद्योग समूहावर सुरू झाली आणि त्यानंतर एक वेगळीच अफवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली. आणि ज्या ग्राहकांनी ज्ञानराधा मध्ये आपल्या ठेवी ठेवलेले आहेत त्या असुरक्षित आहेत अशा प्रकारच्या वावड्या उठू लागल्या. त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांनी ज्ञानराधा मध्ये ठेवी ठेवलेल्या होत्या त्या काढून घेण्यासाठी मागच्या दोन दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून मल्टीस्टेटच्या व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे.कुटे ग्रुपच्या वतीने ग्राहकांना ठेवी सुरक्षित असल्याचे वारंवार आवाहन करूनही त्यावर ग्राहकांचा विश्वास बसलेला दिसत नाही. त्यामुळे आपापल्या ठेवी काढून घेण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या शाखांमध्ये गर्दी करू लागलेले आहेत. शुक्रवारी पहाटपासूनच केज शहरातील कानडी रोडवरील ज्ञानराधाच्या शाखेसमोर ग्राहकांनी अगदी शटर उघडण्याच्या अगोदरच गर्दी केली असून आपापल्या ठेवी काढून घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे केज शहरातील कानडी रोडवर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
वास्तविक पाहता एखादा उद्योग उभा करण्यासाठी मोठे कष्ट आणि वेळ द्यावा लागतो आणि त्या उद्योगामुळे जिल्ह्याचे नावही मोठे होते. आणि आर्थिक उलाढाल ही वाढते. मात्र ही जर केवळ अफवा असेल तर अशा अफवांमधून एखादा उद्योग बंद पडू नये एवढीच अपेक्षा.