#Crime
आर्थिक कारणावरून तरुणाचे अपहरण….!
केज दि. 21 – साखर कारखान्यास – जाण्यास नकार देत उचलीचे पैसे परत करू असे म्हणाल्यावरून एका ऊसतोड मजूर तरुणाचे मुकादम व त्याच्या साथीदारांनी जीपमधून अपहरण केल्याची घटना चिंचोलीमाळी ( ता. केज ) शिवारात घडली. याप्रकरणी मुकादमासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदूरघाट ( ता. केज ) येथील शोभा नवनाथ शिंदे यांचा मुलगा प्रदीप नवनाथ शिंदे याने दोन महिन्यांपूर्वी जिवाचीवाडी येथील मुकादम रामेश्वर वैजनाथ गदळे व दिपेवडगाव येथील विठ्ठल चव्हाण यांच्याकडून १ लाख
८५ हजार रुपयांची उचल घेतली होती. त्यानंतर त्याची साखर कारखान्याला जाण्याची इच्छा नसल्याने त्याने घेतलेली उचल परत करण्याचा निर्णय घेत पैसे परत करण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता केजला आले. त्यांनी मुकादम रामेश्वर गदळे व विठ्ठल चव्हान यांची भेट घेऊन १ लाख रुपये परत दिले. उर्वरित रक्कम १० ते १५ दिवसात देऊ असे ठरवून शोभा शिंदे या गावातील सय्यद इरशाद यांचे दुचाकीवर तर प्रदीप शिंदे हा गावातील बबन शिंदे यांच्या दुचाकीवर बसून गावाकडे निघाले होते. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चिंचोलीमाळी शिवारात रस्त्याच्या कॉर्नरवर पाठीमागून आलेली जीप त्यांच्या दुचाकीला आडवी लावून मुकदम रामेश्वर गदळे, विठ्ठल चव्हान व अनोळखी दोन इसमांनी खाली उतरुन विठ्ठल चव्हान हा प्रदीप यास तु आमचे पैसे घेवुन कुठं पळणार आहेस असे म्हणत त्यांनी प्रदीप शिंदे याला बळजबरीने जीपमध्ये बसवून ते परत केजकडे घेऊन गेले.
दरम्यान, शोभा शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकदम रामेश्वर गदळे, विठ्ठल चव्हान यांच्यासह अनोळखी दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार रामहरी भंडाने पुढील तपास करत आहेत.