ब्रेकिंग
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या….!
केज दि.२१ – तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील एका शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील हनुमंत विश्वनाथ गायकवाड (अंदाजे वय ४५) यांनी आर्थिक विवंचनेतून आपले जीवन संपवले. हनुमंत गायकवाड यांना केवळ एक एकर जमीन आहे आणि त्यातच सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने मागच्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. आणि याचाच ताण असह्य झाल्याने त्यांनी शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास शेतातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने अंबाजोगाई च्या दवाखान्यात हलवण्यात आले मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले असा मोठा परिवार असून कुटुंबावर घरातील कर्ता माणूस गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान आर्थिक विवंचनेतून घरातील कुटुंब कर्त्याने आत्महत्या केल्यास कुटुंबावर मोठा ताण येतो. आणि त्या संकटाला सामोरे जाणे कुटुंबाला कठीण जाते. यासाठी प्रशासनाने अशा घटनांची तात्काळ दखल घेऊन कुटुंबाला वेळेवर मदतीचा हात देणे गरजेचे आहे.