बेंगलोर – दोघांनीही अनेक स्वप्न रंगवले होते. त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी परिश्रम घेत होते. यापैकी सर्वात मोठे स्वप्न होते घराचे. मात्र स्वप्नपूर्ती होण्याअगोदारच दैवाने साथ सोडली.तरीही कर्नाटकमध्ये एका व्यापाऱ्याने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दु:खी न होता तिच्या प्रेमाखातर जिवंत वाटणारा हुबेहुब सिलिकॉनचा पुतळा तयार करुन घेतला. तसेच त्या पुतळ्यासोबत नवीन घरात गृहप्रवेशही केला.
कर्नाटकमधील कोप्पलमध्ये राहणारे व्यापारी श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नी माधवी यांचा 2017साली तिरुपती बालाजीला जात असताना एका कार अपघातात मृत्यू झाला होता. त्या दोघांनी एकत्र आपल्या नव्या घराचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या जिवंतपणी हे स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, परंतू श्रीनिवास यांनी पत्नी गेल्यावरही ते स्वप्न पूर्ण केलं. त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचा सिलिकॉनचा पुतळा बनवून घेतला.श्रीनिवास यांनी बंगळूरच्या श्रीधर मूर्ती या आर्टिस्टकडून हा पुतळा तयार करुन घेतला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी आर्टिस्टला एक वर्षाचा कालावधी लागला, असं त्यांनी सांगितलं.गृहप्रवेश करताना माझ्यासोबत या घरात माझी पत्नी देखील आली आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. घराचं स्वप्न हे तिचं होतं, अशी भावना श्रीनिवास गुप्ता यांनी व्यक्त केली.